भामरागडला पडला पाण्याचा वेढा, मुख्याध्यापकासह दोघे वाहून गेले

11 मार्गावरची वाहतूक ठप्प

भामरागडचे रस्ते आणि चौक असा जलमय झाला आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात सोमवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने हाह:कार उडाला आहे. सर्वदूर कोसळत असलेल्या पावसाने जिकडे-तिकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज (दि.20) सकाळी 11 मार्गावरील वाहतूक बंद असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पूर्व टोकावरील भामरागडच्या पर्लकोटा नदीचे पाणी गावात शिरले आहे. प्रशासनाने काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले असले तरीही पुराचे पाणी घरात आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील एक युवक खंडी नाल्याच्या पुरात वाहून गेला, तर अहेरी तालुक्यातील पल्ले येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक असंतू सोमा तलांडी (40 वर्ष) हे सिपनपल्ली नाल्याच्या पुरात वाहून गेले. दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत.

रस्ते आणि ठेंगण्या पुलांवर पुराचे पाणी आल्याने मार्ग बंद होऊन शेकडो गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पावसाचा फटका गडचिरोली शहरातही बसला. गोकुळ नगरासह काही सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. पारडी येथील शांताराम मुरतेली यांचे घर पडले. सुदैवाने जीवित हाणी झाली नाही.

पुरातून जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला

भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील लालचंद कपिलसाही लकडा (19 वर्षे) हा तरुण खंडी नाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला. लालचंद हा सोमवारी कामानिमित्त खंडी गावात गेला होता. काम आटोपून परत येत असताना खंडी नाल्याला पूर आला असताना तो नदी पार करत होता. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो वाहून गेला. दुसऱ्या घटनेत मुख्याध्यापक असंतू सोमा तलांडी हे पेरमिलीवरून सिपनपल्ली मार्गे जोनावाही या आपल्या गावी जात होते. मात्र सिपनपल्ली नाल्याच्या पुरातून जाण्याच्या प्रयत्नात ते पात्रात वाहून गेले. भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ ताडगावचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, कर्मचारी तसेच गावकरी यांनी प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास लालचंदचा आणि आज मुख्याध्यापक तलांडी यांचा मृतदेह हाती लागला.

24 तासात तालुकानिहाय असा झाला पाऊस

मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात 24 तासात सरासरी 82.1 मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाधिक 147 मिमी देसाईगंज तालुक्यात झाला. याशिवाय गडचिरोली : 121.6 मिमी, धानोरा : 83.5 मिमी, देसाईगंज : 147.0 मिमी, आरमोरी : 128.3 मिमी, कुरखेडा : 61.6 मिमी, कोरची : 39.0 मिमी, चामोर्शी : 67.6 मिमी, मुलचेरा : 61.4 मिमी, अहेरी : 41.1 मिमी, सिरोंचा : 42.2 मिमी, एटापल्ली : 61.6 मिमी, भामरागड : 130.0 मिमी असा पाऊस झाला आहे.

पुरामुळे बंद असलेले मार्ग (बुधवारी सकाळची स्थिती)

1) हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग-130 डी (पर्लकोटा नदी), तालुका भामरागड
2) अहेरी- वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला), ता.अहेरी
3) सिरोंचा- असरअली जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग 63 (सोमनपल्ली नाला), तालुका सिरोंचा
4) मनेराजाराम ते दामरंचा रस्ता (बांडिया नदी), ता.भामरागड
5) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-53 स्थानिक नाला), तालुका चामोर्शी
6) कोपला- झिंगानूर रस्ता (ता.सिरोंचा)
7) शंकरपूर ते विठ्रठलगाव रस्ता प्रजिमा-1, तालुका देसाईगंज
8) कोकडी ते तुळशी रस्ता प्रजिमा -49, तालुका देसाईगंज
9) कोंढाळा-कुरुड-वडसा रस्ता प्रजिमा-47, तालुका देसाईगंज
10) भेंडाळा-बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-17, (हळदीमाल नाला)
11) हलवेर ते कोठी रस्ता इजिमा-24, तालुका भामरागड