गडचिरोली : येथील ज्येष्ठ पत्रकार उदय बळीरामजी धकाते (गडचिरोली) यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यानुरूप पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गोयेगाव मंडल, केरामेरी जि.आसिफाबाद (तेलंगणा) येथे ‘श्रीगुरुदेव पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दिवंगत पुरुषोत्तम हिरादेवे स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती, चंद्रपूर (महाराष्ट्र) यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.
उदय धकाते यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी पत्रकारिता आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून विशेष कार्य केले आहे. त्यांनी “ग्रामगिता घरोघरी” हा उपक्रम आपल्या युट्यूब चॅनलद्वारे राबवून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अमृतवाणीतील प्रवचने अनेक भागांतून थेट प्रसारित केली. तसेच श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या विविध उपक्रमांचे वृत्तांकन करून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला. या कार्याची दखल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेने घेतली.
मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने आयोजित २० वे आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य संमेलन तेलंगणा राज्यातील गोयेगाव येथे पार पडले. संमेलनाध्यक्ष अॅड.पारोमिता गोस्वामी, उद्घाटक आमदार कोवा लक्ष्मी, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख गोपाल कडू, ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर, अॅड.सारिका जेनेकर, श्रीकांत धोटे आदींच्या उपस्थितीत धकाते यांना रोख रक्कम, मानवस्र, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व ग्रामगिता प्रदान करून कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला.
































