शासकीय कामासाठी सती नदीतून वाळूचा अनियंत्रित उपसा

दिल्लीच्या कंत्राटदाराचा प्रताप

नियमांना बगल देत असा बेसुमार वाळू उपसा केला जात आहे

कुरखेडा : तालुक्यात पुन्हा एकदा अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ सुरू केला आहे. नान्ही वाळूघाट प्रकरणात 1.46 कोटींचा दंड ठोठावल्यानंतर आता गुरनोली गावालगतच्या सती नदीतून वाळूचे अनियंत्रित खनन सुरू आहे. शासकीय एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामासाठी दिल्लीच्या कंत्राटदाराकडून हा अनियंत्रित उपसा केला जात असल्याचे सांगितले जाते.

प्राप्त माहितीनुसार, दिल्ली येथील ‘द युनिक एंटरप्राइजेस’ या बांधकाम कंपनीने शासनाकडून कोणतीही वाळू उत्खनन परवानगी किंवा महसूल अदा न करता सती नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

हे अवैध वाळू उत्खनन गेवर्धा ग्रामपंचायत क्षेत्रातील गुरनोली गावालगत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामासाठी केले जात आहे. उपसलेली वाळू थेट शासकीय बांधकामात बेधुंदपणे वापरली जात आहे. मुख्य मार्गालगत उघड्यावर ठेवलेल्या या अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांची नजर पडू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नान्ही प्रकरणात कंत्राटदारावर दंड आकारला गेला, पण तहसीलदार व संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे कंत्राटदारांशी पुन्हा हातमिळवणी करून अवैध उपसा करण्याची संधी साधली जात आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.