चामोर्शी : छत्तीसगडमधून लोखंडी पत्रे घेऊन गडचिरोली-आष्टी मार्गे चंद्रपूर जिल्ह्याकडे जात असलेला एक भरधाव ट्रक अनखोडा येथील वळणावर अनियंत्रित होऊन उलटला. यात ट्रकमधील तिघा जणांसह रस्त्याने जात असलेल्या स्कुटीवर टिनाचे पत्रे कोसळल्याने स्कुटीस्वारही जखमी झाला. विशेष म्हणजे आष्टी-चामोर्शी या मुख्य रस्त्यावर ट्रक आडवा पडल्याने बराच वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
प्राप्त माहितीनुसार, सीजी 07, सीआर 4622 हा ट्रक लोखंडी पत्रे घेऊन जात असताना अनखोडा वळणावर तो उलटला. याचवेळी समोरून स्कुटीवरून येत असलेल्या रमेश शेरकी (60 वर्ष) यांना लोखंडी पत्रे लागल्याने ते जखमी झाले.
ट्रकमधील तिघेही जखमी छत्तीसगडच्या भिलाईचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर आष्टीत प्रथमोपचार करून त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आष्टी ठाण्याचे निरीक्षक विशाल काळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
उलटलेला ट्रक भररस्त्यात आडवा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने त्या ट्रकला बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेचा अधिक तपास आष्टी पोलीस करत आहेत.