गडचिरोली : खरीप हंगामाचे पीक लवकरच घरी येणार, या आशेने दिवाळीचा सण उत्साहाने साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंद अवकाळी पावसाने हिरावून त्यांना चिंतेत टाकले आहे. शनिवारी संध्याकाळी उत्तर गडचिरोलीसह जिल्ह्याच्या अनेक भागात बरसलेल्या पावसाने कापणी करून शेतात ठेवलेल्या धानाच्या पिकाला फटका बसला आहे. दरम्यान कोरची तालुक्यात पावसाचे सावट पाहून शेतातील धानाच्या गंजीला ताडपत्रीने झाकून ठेवण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा वीज पडून मृत्यू झाला. यावेळी दुसरा युवक जखमी झाला आहे.

वीज पडण्याची ही घटना कोरची तालुक्यातील केसालडाबरी या गावाच्या शेतशिवारात दुपारी घडली. सरगम सोमनाथ कोरचा (17 वर्ष) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा सहकारी योगेश घावळे (17 वर्ष) हा जखमी झाला आहे. मृत सरगम हा मसेली येथील छत्रपती विद्यालयात शिक्षण घेत होता.
प्राप्त माहितीनुसार, सोमनाथ आणि त्याचा नातेवाईक असलेला गोंदिया जिल्ह्यातील गुजूरबडगा या गावातील योगेश घावळे हे दोघे गंजीवर ताडपत्री झाकण्यासाठी गेले होते. यादरम्यान पाऊस सुरू झाल्याने त्यांनी शेतातील मोहाच्या झाडाखाली आश्रय घेतला. पण नेमके त्याच वेळी विजांचा कडकडाट होऊन ते उभे असलेल्या मोहाच्या झाडावर वीज कोसळली. यात सरगम गंभीररित्या भाजल्या जाऊन तिथेच कोसळला. तर त्याचा नातेवाईक योगेश जखमी झाला. काही अंतरावर असलेले सरगमचे वडील थोडक्यात वाचले. यानंतर दोघांनाही कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॅाक्टांनी सरगमचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. योगेशवर प्राथमिक उपचार करून त्याला चिचगड (गोंदिया) येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
आणखी तीन दिवस पावसाचे
हवामान खात्याच्या अंदाजापासून गडचिरोली जिल्ह्यात दि.25 ते 28 सप्टेंबरदरम्यान काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन धान कापणीच्या तयारीत असलेल्या आणि कापून झालेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तोंडाशी आलेला घास हिरावण्यासारखी त्यांची स्थिती झाल्याचे दिसून येते. संभाव्य पावसाने शेतमाल खराब होऊ नये म्हणून कापणी, काढणी, तोडणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आला आहे.
































