गडचिरोलीतून सव्वा तासात जाता येईल भंडाऱ्यात, अंतर घटणार

94 किमीचा सुधारित द्रुतगती मार्ग

गडचिरोली : गडचिरोली-भंडारा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाच्या सुधारित आखणीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यात गडचिरोली ते भंडारा प्रवासाचे अंतर 23 किलोमीटरने कमी होईल. त्यामुळे अवघ्या सव्वा तासात भंडाऱ्यात पोहोचता येणार आहे. त्यासाठी 931.15 कोटींच्या तरतुदीला राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली.

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पूर्ण केला जाणार आहे. विदर्भातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम करण्यासाठी भंडारा–गडचिरोली प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस दि.27 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. आता या महामार्गांतर्गत नागपूर-गोंदिया प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या सावरखेडा इंटरचेंजपासून राज्य महामार्ग-53 वरील कोकणा (गड)पर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधणे आणि बोरगाव इंटरचेंज ते राज्य महामार्ग-353 ड वरील रणमोचनपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधणे, अशा एकूण 94.241 किलोमीटरच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली. त्यापोटी 534.46 कोटी आणि व्याजापोटी 396.69 कोटी अशा एकूण 931.15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.