गडचिरोली : जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर आजपासून नवरात्रौत्सवाला सुरूवात होत आहे. सार्वजनिक मंडळांकडून दुर्गादेवीच्या घटस्थापनेसह विविध देखावे साकारले जाणार आहेत. गडचिरोलीत युवागर्जना फाउंडेशनतर्फे आयोजित दुर्गा उत्सवात अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र राहणार आहे, तर दुर्गा उत्सवासाठी प्रसिद्ध आरमोरी शहरात उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिर आणि हरसिद्धी माता मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
आरमोरी येथील जुन्या बस स्टँडजवळील नवदुर्गा उत्सव मंडळाकडून सकाळी मिरवणुकीने देवीचे आगमन होऊन घटस्थापना होईल. शहरात 2 दुर्गा आणि 3 शारदा उत्सव मंडळांकडून घटस्थापना होणार आहे. दरवर्षी आरमोरीतील देखावे जिल्हावासियांसाठीच नाही तर लगतच्या जिल्ह्यातील भाविकांसाठीही आकर्षणाचे केंद्र असतात. धार्मिक उत्सवासोबत विविध सामाजिक उपक्रमही मंडळांकडून राबविले जातात. टिळक चौक दुर्गम उत्सव मंडळातर्फे लोणावळ्यातील आई एकविरा मंदिराचा देखावा, नेहरू चौकात शारदा उत्सव मंडळातर्फे पुरी येथील जगन्नाथ मंदिर साकारले जात आहे, तर सुभाष चौक शारदा उत्सव मंडळातर्फे चंद्रपूरच्या महाकाली मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. भाविकांची गर्दी पाहता बर्डी रोडवरील मैदानात मिनाबाजारही भरतो. यामुळे नवरात्रौत्सवादरम्यान आरमोरीला जत्रेचे स्वरूप येणार आहे.
देवकुले प्रांगण भाविकांनी फुलणार
गडचिरोलीच्या चंद्रपूर रोडवरील देवकुले प्रांगणात युवागर्जना फाउंडेशनकडून दुर्गोत्सवाच्या 9 व्या वर्षी स्वामी नारायण अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सहकार्याने आयोजित या देखाव्यासोबत जागरण, विदर्भस्तरीय गरबा स्पर्धा, बालसंस्कार शिबीर, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भजन संध्या, गायत्री महायज्ञ, अथर्वशीर्ष पठण, देवीचा गोंधळ, नवरात्रीचा गरबा आणि दसरा महोत्सव असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
मंडळाचे अध्यक्ष अनिल तिडके, उपाध्यक्ष स्वप्निल कायरकर, सचिव निखिल चरडे, आशिष रोहणकर, आशिष कापडे, विशाल हरडे, मनोज देवकुले, हिमांशु खरवडे, अंकुश पवार, अमोल चापले, अनिकेत हर्षे, सतीश चिचघरे, साई सिल्लमवार, यश कोंडावार, रितेश केराम, तेजस लाकडे, स्वप्निल आडेवार, मंगेश रणदिवे आदी या उत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.