गडचिरोली तालुक्यात रस्त्यांच्या सीमांकनासह उपक्रमांना गती

सेवा पंधरवड्यात गुंतले अधिकारी

पांदण रस्त्यांचे सीमांकन करताना गडचिरोली तहसीलचे अधिकारी व कर्मचारी

गडचिरोली : नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळयाच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला महसूल विभाग अधिक लोकाभिमुख आणि गतीमान करण्यासाठी सेवा पंधरवडा सुरू आहे. याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये गडचिरोली तालुक्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचारी गुंतले आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टिने महत्वाच्या असणाऱ्या पांदण रस्त्यांचे नामांकन करून प्रस्ताव मंजुरीच्या कामाने वेग घेतला आहे.

पंतप्रधान (राष्ट्रनेता) नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (दि.17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि.2 ऑक्टोबर) या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हा सेवा पंधरवडा राबविला जात आहे. या कालावधीत विविध उपक्रम मोहिम स्वरुपात राबविण्यात येत आहेत. गडचिरोली तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजीत करुन शेताच्या पांदण रस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीबाबतची कार्यवाही सुरू आहे. सर्व ग्राम पंचायत अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि सरपंच, पदाधिकारी व नागरीकांच्या उपस्थितीत ग्रामसभा यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या.

पहिला टप्प्यात 17 ते 22 सप्टेंबरपर्यंत ग्रामीण शिवार / पांदण रस्ते मोहीम पार पाडली जात आहे. उद्या दि.23 पासून दुसरा टप्पा सुरू होईल. त्यात 27 सप्टेंबरपर्यंत अतिक्रमनधारकांना पट्टे वाटप करण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली जातील. तर तिसऱ्या टप्प्यात 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना दाखले वाटप, आपसी वाटणी कलम 85, 7/12 वर कायदेशिर पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नांव नोंद करण्यासाठी लक्ष्मीमुक्ती योजनेची अंमलबजावणी होईल.

शनिवारी सकाळी 7 वाजता मौजा पुलखल येथे नकाशावर असलेले 8 व नकाशावर नसलेले 11 शेत पांदण रस्ते सीमांकन करताना सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव, तहसीलदार शुभम पाटील तसेच भूमी अभिलेख, महसूल विभाग, ग्राम पंचायत अधिकारी / कर्मचारी / पदाधिकारी उपस्थित होते. गडचिरोली तालुक्यात या विविध उपक्रमांसाठी तहसीलदार शुभम पाटील, नायब तहसीलदार चंदु प्रधान यांच्या मार्गदर्शनात इतर अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत.