आजपासून गडचिरोलीत व्हीसीए टी-20 क्रिकेट स्पर्धेची सुरूवात

विदर्भातील 10 संघ सहभागी होणार

Cricket Player Playing Short Concept

गडचिरोली : विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यांच्या वतीने यावर्षीची व्हीसीए टी-20 क्रिकेट स्पर्धा गडचिरोलीत होणार आहे. गुरूवार, दि.24 एप्रिल रोजी या स्पर्धेची सुरूवात जिल्हा प्रेक्षागार मैदानावर होणार असून त्यात विदर्भातील 10 संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतूनच विदर्भाचा टी-20 संघ तयार होण्यास वाव मिळणार आहे.

ही स्पर्धा नागपूर विभागात गडचिरोली आणि अमरावती विभागात अमरावती येथे एकाच दिवशी सुरू होणार आहे. गडचिरोलीत होणाऱ्या स्पर्धेत अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि यवतमाळ हे संघ आपापल्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर अमरावतीमध्ये वर्धा, वाशिम, बुलडाणा, अकोला व नागपूर ग्रामीण तथा गडचिरोली हे संघ प्रतिनिधीत्व करणार आहेत.

गडचिरोलीत उत्कृष्ट असे 90 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्व नियम व अटी शर्ती लागू राहणार आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा ग्रामीण खेळाडूंसाठी एक पर्वणी ठरणार आहे.

या स्पर्धेतील सामन्यांना सकाळपासून सुरूवात होणार असून ही स्पर्धा 30 एप्रिलपर्यंत चालणार असल्याचे आयोजकांनी कळविले.