गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या काळात अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैधपणे दारूची वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवरही नाके सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी संशयित वाहनांची 24 तास तपासणी केली जात आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत हे चेकपोस्ट सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्याला लागून असलेल्या तेलंगणा आणि छत्तीसगड राज्य सीमेवर 11 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. त्यासोबत आता जिल्ह्याच्या सीमेवरही तपासणी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीत वापरल्या जाऊ शकणाऱ्या कोणत्याही अनधिकृत गोष्टीची वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अलर्ट झाले आहेत. कोणत्याही स्थितीत निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत.
अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक यावर विशेष लक्ष असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा सीमेवर असलेल्या हरणघाट नदीच्या तीरावर चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. चेकपोस्टच्या ठिकाणी राहुटी लावण्यात आली असून त्या ठिकाणी तीन अंमलदारांना ड्युटी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून रात्रंदिवस संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.