विविध कार्यक्रमातून होणार स्तनपानाबद्दल जनजागृती

जागतिक स्तनपान सप्ताह सुरू

गडचिरोली : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताहाला 1 ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. ‘स्तनपानात गुंतवणूक करा, आरोग्यदायी भविष्य घडवा’ ही यावर्षीची थिम असून, तिचे महत्त्व अधोरेखित करताना उपस्थित मान्यवरांनी मातांच्या आरोग्याची, बाळाच्या पोषणाची व समाजाच्या आरोग्यदायी भविष्याची खात्री स्तनपानातूनच संभवते, असे सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 7 ऑगस्ट या सप्ताहभर स्तनपानांचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाला कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीश साळुंखे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत पेंदाम, तसेच जिल्हा महिला ब बाल रुग्णालयाचे कर्मचारी, अधिकारी तसेच लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी तज्ज्ञांनी स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगितले. स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आरोग्यव्यवस्था, कुटुंब आणि धोरणकर्त्यांनी यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. स्तनपानाचे प्रोत्साहन हे दीर्घकालीन आरोग्यदायी परिणामांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर गुंतवणूक आहे, असे मार्गदर्शकांनी सांगितले.

शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी रांगोळी, पोस्टर, घोषवाक्य व निबंध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मान्यवरांनी स्पर्धांचे परीक्षण करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन प्रतिज्ञा रामटेके यांनी केले.

आठवडाभर विविध कार्यक्रम

या संपूर्ण आठवड्यात गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी रुग्णालयाच्या विविध विभागांमध्ये स्तनपानाचे फायदे आणि योग्य पद्धती यावर आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, गावस्तरांवर समुपदेशन सत्रे, पथनाट्य, माता बैठका घेतल्या जाणार आहे. या कार्यक्रमांचे उद्दिष्ट स्तनपानासंबंधी चुकीच्या समजुती दूर करणे आणि मातांना योग्य मार्गदर्शन करणे हे आहे. 7 ऑगस्ट रोजी या सप्ताहाचा समारोप नर्सिंग विद्यार्थ्यांच्या नाटिका सादरीकरणाने होईल.

स्तनपानातून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल

जागतिक स्तनपान सप्ताहादरम्यान गावस्तरावर असेच विविध कार्यक्रम राबवून माता आणि कुटुंबियांना निव्वळ स्तनपान करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी केले आहे. तसेच स्तनपानात गुंतवणूक म्हणजेच एका निरोगी, सक्षम व सुदृढ समाजाच्या उभारणीत केलेली महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे, आणि याचे महत्त्व समाजात पटवून दिल्यास जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यात नक्कीच यश येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले.

स्तनपान हे आईच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. आईचे दूध बाळासाठी एक परिपूर्ण आणि नैसर्गिक आहार आहे. यात आवश्यक पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि अँटीबॉडीज असतात, जे बाळाला अनेक आजारांपासून वाचवतात. त्यामुळे बाळाला जन्मानंतर कमीत कमी सहा महिने फक्त स्तनपान करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.