गडचिरोलीतील ‘लाडक्या बहि‍णीं’शी मुख्यमंत्री शिंदे यांचा व्हिडीओ संवाद

दुर्गम भागात योजना पोहोचल्याचा आनंद

गडचिरोली : शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य योजने’च्या लाभार्थींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. गडचिरोलीतून जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची राज्यातील पहिली लाभार्थी सोनाली गेडाम यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले मनोगत व्यक्त केले.

गडचिरोलीच्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ पोहोचला. शासकीय योजना सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन मनापासून काम करत असल्याची ही फलश्रुती असून याचा मला आनंद आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना प्रभावीपणे राबवित असल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक आणि अभिनंदन केले.

यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, शिक्षणाधिकारी बी.एस. पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू प्रामुख्याने उपस्थित होते.

सोनाली गेडाम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधताना ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ काढल्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करत राज्याची प्रथम लाभार्थी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. या प्रशिक्षणाचा लाभ कायम नोकरीसाठी आणि विद्यावेतनाचा लाभ पुढील शिक्षणासाठी होईल, असा विश्वास सोनालीने व्यक्त केला.