वैरागड : येथून पाच किलोमीटरवर असलेल्या लोहारा येथील शेतकरी तथा कोजबी येथील पेसा ग्रामकोष समितीचे अध्यक्ष वामन बाजीराव कुमरे (48 वर्ष) यांचा शेतातील बोडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.4) सकाळच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, लोहारा येथील वामन कुमरे हे आपल्या मुलासोबत शेताचे काम करण्यासाठी गेले होते. शौचास जातो म्हणून ते शेतालगत असलेल्या बोडीवर गेले. परंतु तलावाच्या पाळीला उतार असल्याने वामन कुमरे यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात पडले. एक तासाचा कालावधी उलटल्यानंतरही वडील परत न आल्याने त्यांच्या मुलाला शंका आली. त्याने तलावात जाऊन बघितले असता वामन कुमरे पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिसले. त्याने आरडाओरड केल्याने शेताजवळील शेतकरी आले, परंतु तलावातील पाणी खोल असल्याने वामन यांना पाण्याबाहेर काढू शकले नाही. त्यामुळे आरमोरी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चलाख करीत आहे.
मृत वामन कुमरे यांची पत्नी कोजबी ग्रामपंचायतची ग्रामपंचायत सदस्य असून ते स्वतः पेसा ग्राम कोष समितीचे अध्यक्ष होते. शांत, सुस्वभावी व संयमी वृत्तीचे असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व मोठा परिवार आहे.