‘विदर्भ राज्याचा विसर पडल्यास देवेंद्र फडणविसांची आणखी पदावनती’

10 आॅगस्टला विधानभवनावर विदर्भाचा झेंडा !

गडचिरोली : गेल्या निवडणुकीत दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळले नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ चंडिकेचा शाप मिळाला आणि ते मुख्यमंत्री पदावरून पदावनत होऊन उपमुख्यमंत्री झाले. अजूनही त्यांना विदर्भ राज्य निर्मितीसाठी दिलेले आश्वासन आठवत नसेल तर भविष्यात त्यांना नगरसेवकही होऊ देणार नाही, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शनिवारी (दि.20 जुलै) येथे पत्रकार परिषदेत देण्यात आला.

यावेळी संघटनेचे पूर्व विदर्भ विभागाचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, गडचिरोली जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष नासिर जुम्मन शेख आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नव्या सरकारला इशारा देत महाराष्ट्रवादी चले जाओ, असा नारा देत क्रांतीदिनाचे औचित्य साधनू येत्या 10 आॅगस्टला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नागपूर येथील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण, लाडका भाऊ योजना चुकीची, बेरोजगारांना आळशी करणारी असल्याचे सांगत, महाराष्ट्र राज्य आधीच कर्जबाजारी असताना या योजनांसाठी पैसा आणणार कुठून? अशावेळी तो पैसा सामान्य जनतेच्या खिशातून कररूपाने वसुल केला जाण्याची शक्यता यावेळी अरूण केदार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावा, पीक विमाधारकांना नुकसानभरपाई द्यावी, विदर्भात स्मार्ट प्रिपेड मीटर कुठेही लावू नये तसेच आष्टी ते सुरजागड काँक्रिट रस्ता बांधकामास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, बल्लारशहा ते सुरजागड रेल्वे मार्गास केंद्र सरकारने तत्काळ मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशाही मागण्या निदर्भ राज्य आंदोलन समितीकडून केल्या जात आहेत. 10 आॅगस्टच्या आंदोलनात संपूर्ण विदर्भातून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.