संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी जलजागृती सप्ताहाला सुरूवात

22 मार्चपर्यंत विविध उपक्रम

जलप्रतिज्ञा घेताना उपस्थित कर्मचारी आणि नागरिक.

गडचिरोली : भविष्यातील भीषण जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर व पुनर्वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने घराघरात आणि कार्यालयांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बसवावी, असे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले.

जलसंपदा विभागाच्या वतीने 16 ते 22 मार्चपर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या प्रांगणात रविवारी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा युथ अधिकारी अमित पुंडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अभियंता गणेश परदेशी, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी अरुण वसवाडे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेल्फेअरचे संस्थापक मनोहर हेपट, तसेच जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या अधीक्षिका श्रीमती गुरपुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारण, जलप्रदूषण टाळणे, तसेच पाण्याच्या गुणवत्तेचे संवर्धन याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. यासोबतच जिल्ह्यात शाळा व महाविद्यालयांमध्ये जलप्रतिज्ञा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी जलजागृती सप्ताहाच्या उद्देशावर प्रकाश टाकला.

सप्ताहात हे उपक्रम राबविणार

16 ते 22 मार्च या सप्ताहात जिल्हा, तालुका व गावपातळीवर जलप्रतिज्ञा, चर्चासत्रे, वेबिनार, चित्रकला व रांगोळी स्पर्धा, कार्यशाळा, जलदिंडी, प्रभातफेरी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्थळी भेटी यासारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यात सर्व उपस्थितांनी सामूहिक जलप्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमाला जलसंपदा व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, प्रशिक्षणार्थी परिचारिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बी.एस.भांडेकर यांनी केले.