गडचिरोली : तापणाऱ्या उन्हामुळे शरीराला वारंवार पाण्याची गरज भासते. माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही पाणी मिळाले नाही तर त्यांचा जीवही जातो. त्यामुळे एका पक्षीप्रेमी युवकाने आपल्या परसबागेत चक्क पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली. नामदेव वासेकर असे त्या पक्षीप्रेमी युवकाचे नाव आहे. कुनघाडा रै. येथील आपल्या घरी त्याने सुरू केलेला हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देत आहे.

पक्षी हा निसर्ग मित्र आहे. त्यामुळे निसर्ग मित्रच राहिले नाही तर निसर्गाचा एक महत्वपूर्ण घटक दिवसेंदिवस धोक्यात येईल. कारण जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटलेले असतात. त्यामुळे प्राण्यांना प्यायला पाणी मिळत नाही. यातच बरेच पक्षी मरण पावतात. काही पक्षी उन्हाळ्यात जिथे पाणी आणि चारा मिळतो अशा ठिकाणी वास्तव करतात. त्यामुळे नामदेव वासेकर यांनी आपल्या घराच्या आवारात स्वत: लावून वाढवलेल्या वृक्षावर पक्ष्यांसाठी पाण्याची आणि चाऱ्याची सोय केली. गेल्या 8 वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात ते हा उपक्रम राबवत आहेत हे विशेष.
वासेकर यांनी आपल्या घराच्या समोर आंबा, आवळा, रिठा, बेल, जांभुळ, सिसम, पेरू, लिंबू, चिकू, बदाम, जास्वंद अशा विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करुन त्या झाडांना पाणी देऊन लहानाचे मोठे केले. आज त्या झाडांवर अनेक प्रकारचे पक्षी येवुन मनसोक्त आनंद घेत असतात. आपल्या या उपक्रमाचे इतरांनीही अनुकरण करावे, अशी अपेक्षा वासेकर व्यक्त करतात.