Home दैनंदिन बातम्या पहिल्यांदा गावात पोहोचली बस, लोकांकडून वाजतगाजत स्वागत

पहिल्यांदा गावात पोहोचली बस, लोकांकडून वाजतगाजत स्वागत

पोलिसांच्या पुढाकाराने तुमरकोठीत बससेवा

बसचे असे वाजतगाजत स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली

गडचिरोली : ‘गाव तिथे एसटी’ हे एसटी महामंडळाचे ब्रिदवाक्य असले तरीही आदिवासीबहुल व माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक गावांनी अद्याप एसटी बस पाहिलेली नाही. त्यापैकीच एक गाव म्हणजे भामरागड तालुक्यातील तुमरकोठी. या अतिदुर्गम गावात पोलिसांच्या पुढाकाराने आणि एसटी महामंडळाच्या सहकार्याने मंगळवारी (दि.17) प्रथमच एसटी बस पोहोचली. या बसचे वाजतगाजत आणि नाचत स्वागत करण्यात आले. तुमरकोठी ते अहेरी या मार्गावर सुरू झालेल्या या बससेवेमुळे गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही.

भामरागडपासून सुमारे 30 कि.मी. आणि अहेरीपासून सुमारे 100 कि.मी. अंतरावर असणा­ऱ्या मौजा तुमरकोठी येथील नागरिकांना तहसील किंवा जिल्ह्राच्या ठिकाणी जायचे असल्यास गावातून कोणतेच वाहन नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. त्यांचा हा प्रवास सुखद व्हावा यासाठी तुमरकोठी ते अहेरी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.

गावात पहिल्यांदा बस आल्यामुळे गावातील नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत, नृत्य करत वाजत-गाजत बसचे स्वागत केले. शाळेतील लहान मुलांनी तिरंगा हाती घेऊन बसचे स्वागत केले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तुमरकोठी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोउपनि. गोरखनाथ सुरासे यांनी सदर बससेवेचे उद्घाटन केले. हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली व गावक­ऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री लेकामी, गावपाटील रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी, राजु गावडे, तुमरकोठी जि.प. शाळेचे शिक्षक रामा लेकामी यांच्यासह जवळपास 300 नागरिक उपस्थित होते. तुमरकोठी – कोठी – भामरागड – अहेरी या मार्गावर सुरु झालेल्या या बस सेवेमुळे या भागातील 450 ते 500 नागरिकांना लाभ होऊन त्यांचे जीवनमान सुसह्र होणार आहे. या बससेवेमुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे.

सामान्य नागरिकांच्या दळण-वळणाच्या मुलभूत प्रश्नावर उपाय म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्हाभरामध्ये एकूण 559 मोबाईल टॉवर्सची उभारणी करण्यात आली. एकूण 424 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे आणि 65 पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मागील एक वर्षात गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने गट्टा (जां.)- गर्देवाडा – वांगेतुरी, कटेझरी ते गडचिरोली आणि मरकणार ते अहेरी, आंबेझरी ते गडचिरोली मार्गावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दल नागरिकांचे जीवनमान सुसह्र होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफ 191 बटा.एफ कंपनीचे पोलीस निरीक्षक होनप्पा, पोस्टे तुमरकोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. गोरखनाथ सुरासे, आशिष मेश्राम व इतर अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांनी सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.