गरम पाण्याची विहीर झाली नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय

काय असू शकते कारण? वाचा

अहेरी : अहेरी तालुक्यातील ताटीगुडम या दुर्गम गावात एका विहिरीला गेल्या सहा महिन्यांपासून चक्क गरम पाणी येत असल्यामुळे हा आश्चर्याचा आणि कुतूहलाचा विषय झाला आहे. गावातील लोक आंघोळीसाठी ते गरम पाणी नेतात. पण विहिरीला गरम पाणी कसे काय येत आहे याचे नेमके कारण गावकऱ्यांना उमगलेले नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने विहिरीतून गरम पाणी निघत असल्यामुळे हा संशोधनाचा विषय झाला आहे.

कमलापूरपासून अवघ्या 2 किमी अंतरावर रेपनपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या ताटीगुडम या गावातील ही विहीर सत्यांना मलय्या कटकु यांच्या मालकीची आहे. गेल्या सहा महिन्यांपासून, म्हणून उन्हाळ्यापासून या विहिरीला गरम पाणी येत आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची माहिती परिसरातील अनेक गावांमध्ये पसरली. त्यामुळे अनेक जण कुतूहल म्हणून त्या गावात येऊन विहिरीचे पाणी काढून पाहात आहेत. गावातील लोक विहिरीतून काढलेल्या गरम पाण्याचा आंघोळीसाठी वापर करतात.

विशेष म्हणजे आजूबाजूला अनेक विहिरी आहेत, मात्र याच विहिरीला गरम पाणी येत असल्याने याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. गेल्या 20 वर्षात गरम पाणी येण्याची घटना पहिल्यांदाच दिसल्याने याबाबत संशोधन व्हावे अशी मागणी केली जात आहे.

काय म्हणतात खगोल अभ्यासक?

यासंदर्भात खगोल अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे यांना विचारले असता तेथील भौगोलिक स्थितीमुळे विहिरीला गरम पाणी येत असल्याचे सांगितले. विहिरीच्या परिसरातील जमिनीत गंधकाचे प्रमाण जास्त असेल किंवा जमिनीतून लाव्हा बाहेर येत असेल (ज्वालामुखी) तर पाणी गरम येऊ शकते. याशिवाय ज्या भागातील जमिनीत खडकाचे प्रमाण जास्त आहे त्या भागातही हा प्रकार होऊ शकतो. सूर्यकिरणांमुळे जमीनीसोबत त्यातील खडकही गरम होतात आणि त्यामुळे खडकाला लागून असलेले भूगर्भातील पाणी गरम होऊ शकते, असे प्रा.चोपणे यांनी सांगितले. ताटीगुडम गावातील ही विहीर खडकांनी व्यापलेली आणि दगडांनीच बांधलेली आहे. त्यामुळे त्या विहिरीत गरम पाणी आढळण्याचा प्रकार घडला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.