जादुटोण्याच्या संशयातून जीव घेतलेल्या ‘त्या’ दोघांबद्दल होता वेगळाच संशय

म्हणून पती, मुलाने दिली गावकऱ्यांना साथ

बारसेवाडा गावातील याच झोपडीत जमनीबाईच्या अंगात येऊन तिचा दरबार भरत असे.

गडचिरोली : जादुटोण्याच्या संशयावरून गावातील ज्या महिला आणि पुरूष पुजाऱ्याला गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून जीवानिशी मारले आणि नंतर जाळून टाकले त्यांच्याबद्दल गावकऱ्यांमध्ये जादुटोण्यासोबत इतरही संशय होता. त्यामुळेच त्या महिलेचा पती आणि मुलानेही गावकऱ्यांना साथ देत त्यांना संपवण्यासाठी मदत केल्याची बाब समोर आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या गावाला भेट देऊन सर्वांशी संवाद साधल्यानंतर अनेक बाबींचा उलगडा झाला आहे.

एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावात जादुटोण्याच्या संशयातून एका पुरूष आणि एका महिला पुजाऱ्याची जादुटोणा करत असल्याच्या संशयातून गावातील लोकांनी हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. पुरोगामी महाराष्ट्रात जादुटोण्यावर विश्वास ठेवणारे अंधश्रद्धाळू अजूनही गडचिरोली जिल्ह्यात असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह विलास निंबोरकर, बुवाबाबा भांडाफोड शाखेचे राज्य सहकार्यवाह विष्णूदास लोणारे, गडचिरोली जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, जिल्हा निधी व्यवस्थापक गोविंदराव ब्राह्मणवाडे, भंडारा शहर शाखेचे कार्याध्यक्ष नितेश बोरकर, गडचिरोली जिल्हा शाखेचे सदस्य समीर शेख, एटापल्ली शाखेचे कार्याध्यक्ष प्रशांत तेलकुंटलवार, प्रधान सचिव सचिन मोतकुलवार, किशोर मल्लेवार, सुरज जक्कुलवार यांनी बारसेवाडा गाव गाठून वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

पीडितांच्या भेटीतून उघड झाले वास्तव

महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी 5 मे रोजी बारसेवाडा येथे जाऊन पिडीतांच्या नातेवाईकांना भेट देण्याचे ठरवले. त्यांनी बारसेवाडा येथील गाव पाटील लालू रैनू मडावी, माजी सरपंच बालाजी हलामी, प्रतिष्ठीत नागरिक मधुजी मडावी, मंगू वाले वड्डे, मधुकर अतलामी यांची भेट घेऊन सदर घटनेबाबत माहिती जाणून घेतली. त्यात सदर घटना केवळ त्यांच्यामध्ये असलेल्या गैरसमजामधून झाल्याचे लक्षात आले.

अंनिसच्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार, त्या गावातील जमनी देवाजी तेलामी या महिलेच्या अंगात गेल्या पाच-सहा वर्षांपासून देवी येत असे. त्यामुळे तिने आपल्या घरी पिडीत व्यक्तींच्या अंगातील रोगराई काढण्यासाठी एक लहानसा ठाणा (देवघर) घरच्या लोकांच्या मदतीने तयार केला. घरात पती, दोन मुलांपैकी एक मोठा मुलगा, सून, नातवंडे आदी राहतात. मात्र जमनीच्या या देवकीमध्ये परिवारातील कोणतीही व्यक्ती सहभाग घेत नव्हते. काही दिवसांनी त्याच गावातील देवु कटीया अतलामी हा तिला साथ देऊ लागला. त्यामुळे पुढे यांच्यात सलगी वाढत गेली. कधीकधी काही कामानिमित्त दोघेही बाहेरगावी जाऊ लागले आणि गावातील काही लोकांच्या मनात त्यांच्याविषयी वेगळाच संशय निर्माण होत गेला. परंतु तोपर्यंत परिवारातील कोणत्याही व्यक्तींना त्या दोघांबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नव्हती. लहान मुलगा हा देवदा येथे राहतो. या दोघांमध्ये असलेली सलगी मुलांच्या कानावरही पोहोचली आणि पुढे नवऱ्यालाही माहिती झाली असावी अशी शंका व्यक्त करण्यात आली.

अंगात देवी येणाऱ्या जमनीबाईकडे जेव्हा गावातील लोक आजारी व्यक्तीला आणू लागले तेव्हा काहींना फायदा झाला. मात्र ज्यांना काही फायदा होत नसे ते दुसऱ्या पुजाऱ्याकडे जायचे. महिला पुजारी जमनीबाईकडे येणाऱ्यांची संख्या वाढल्याने दुसरा पुजारी जमनीबाई आणि तिचा सहकारी देवु यांच्याबद्दल बदनामीकारक माहिती पसरवत होता. भावकीतील एका कुटुंबातील चार वर्षाची मुलगी मरण पावली, तसेच काही दिवसांनी गर्भपात झाला. जमनीबाई हिच्या जादूटोण्यामुळेच हे झाले असा गैरसमज दुसऱ्या पुजाऱ्याकडून पसरविण्यात आला.

गावसभेतील मौन ठरले शंका बळावण्यास कारणीभूत

गावात अकाली मृत्यूच्या घटना घडत गेल्या. त्यासाठी प्रत्येक वेळी गावसभा घेऊन जमनीबाई व तिचा सहकारी देवु यांच्यावर जादुटोणा करून दुसऱ्यांना त्रास देत असल्याविषयी आळ घेण्यात आला. पण गावसभेत त्या आरोपाविषयी ते दोघेही काहीच बोलत नसत. त्यामुळे त्यांच्याविषयी शंका बळावत गेली. दरम्यान ज्या दिवशी तेलामी कुटुंबातील एका चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला त्या दिवशी ती महिला व संबंधित व्यक्ती त्या गावात हजर नव्हते. नंतर त्यांना गावात सभा बोलावून विचारणा केली असता जमावापुढे ते काहीही सांगायला तयार नव्हते. त्यामुळे गावातील लोकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला रोष वाढत गेला. जमनीबाईचा लहान मुलगा व पती यांनाही शंका होतीच. त्यामुळे आधिच मनात धरून असलेला राग त्या दिवशी उफाळून आला. याशिवाय गावातील दुसऱ्या पुजाऱ्यालाही आगीत तेल ओतण्यासाठी ही संधी योग्य वाटली. जादूटोणार करणारे जमनीबाई आणि तिचा सहकाही देवू हे जर जीवंत राहीले तर आणखी काही लोकांचा जादू करून त्यांचा जीव घेतील असा विचार करून रात्रीच्या वेळी त्या दोघांचाही गेम करण्यात आला. ज्या जसे जमेल तसे त्याने मारण्यास सुरूवात केली. काहींनी लाठ्याकाठ्यांनीही मारले.

पेटवून देण्याआधीच झाला होता मृत्यू

गावकऱ्यांच्या बेदम मारहाणीत दोघांचाही मृत्यू झाला होता. आता ही बाब अंगावर येऊ नये म्हणून त्यांना गावाबाहेरच्या नाल्यात नेऊन टाकायचे आणि नेहमीप्रमाणे हे दोघेही कुठेतरी बाहेरगावी कामासाठी गेले असतील, असे भासवायचे अशी गावातील काही लोकांची योजना होती. मात्र गावातील ज्या व्यक्तीला हे अजीबात पटले नाही, त्या व्यक्तीने पोलिसांपर्यंत ही खबर पोहोचवली आणि सदर प्रकरण उघडकीस आले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अधिक माहिती जाणून घेतली. त्या दोन्ही व्यक्ती जादुटोणा करीत होत्या आणि त्यासाठी गावकऱ्यांनी एक दोन नव्हे, तर तीन-चार सभा घेऊन त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. पण जर ते ऐकत नव्हते तर तुम्ही पोलिस ठाण्यात त्या दोघांविरोधात तक्रार का दाखल केली नाही केली? असा प्रश्नही अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावर गाव पाटील व उपस्थित व्यक्तींनी ही बाब आमच्या लक्षातच आली नाही, ही आमची चूक झाली असे मान्य केले. जर तुम्ही पोलिस ठाण्यात तक्रार दिली असती तर त्यांचे जीव न घेताही त्यांना सुधारण्याची संधी देता आली असती आणि पुढील घटनाही टाळता आल्या असत्या, असे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगत गावकऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.