Home दैनंदिन बातम्या रानटी हत्तींच्या कळपाने घातला पाथरगोटातील मक्यात धुमाकूळ

रानटी हत्तींच्या कळपाने घातला पाथरगोटातील मक्यात धुमाकूळ

पिकांसह व कृषी पंपाचेही नुकसान

आरमोरी : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने आपला मोर्चा पाथरगोटा परिसरातील शेतांकडे वळवत त्या भागात धुमाकूळ घातला. मोठ्या संख्येने आलेल्या या हत्तींच्या कळपाने पाथरगोटा शेतशिवारात मुक्काम करून शेतकऱ्यांचे हाताशी आलेले मका पिक फस्त करून उद्ध्वस्त केले. एवढेच नाही तर सौर उर्जा कृषी पंप, पाईपलाईन, पिकांना देण्यासाठी ठेवलेली खताची पोती, औषधी व इतर साहित्यांची नासधूस केली. या प्रकारामुळे शेतकरी धास्तावले असून पिके वाचविण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे.

ओडिशा राज्यातून छत्तीसगडमार्गे गडचिरोली जिल्ह्यात 6 वर्षांपूर्वी दाखल झालेले हे हत्ती कोरची, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली तालुक्यातील शेतातील उभे पिक फस्त करण्यासोबत ते पायदळी तुडवत आहेत. या रानटी हत्तींच्या कळपाने आतापर्यंत कित्येक हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट केली. त्यांच्या वाटेत आलेल्या अनेकांचा बळीही घेतला, तर काही जणांना जखमी केले आहे. अलिकडे या हत्तींचा देसाईगंज तालुक्यातील शेतामध्ये हैदोस सुरू असतानाच त्यांनी आपला मोर्चा आरमोरी तालुक्याकडे वळविला आहे.

आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांचा मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर हत्तींच्या कळपाने देसाईगंज तालुक्यात प्रवेश केला होता. पण दोन दिवसांपूर्वी रात्री पुन्हा आरमोरी तालुक्यातील पाथरगोटालगतच्या जंगलाजवळील शेतशिवारात मोर्चा वळविला. यात एकाच रात्रीत पाच शेतकऱ्यांच्या मका पिकावर ताव मारला.

शेतकरी अशोक राऊत यांच्या शेतातील मक्यासह सोलर पंप पायाने तुडवून नष्ट केले. तसेच पीव्हीसी पाईप, 17 खताच्या बॅग, ईश्वर राऊत, श्रावण आठवले यांचे विद्युत पेटी, पाईप डीएपी, युरीया, किटकनाशके पायाने आणि सोंडेने दूर फेकून नासधूस केली. सदाशिव आठवले, हेमंत आठवले, अनिल मडपे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी पाथरगोटा परिसरातील मका पिकांची पाहणी केली. यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना प्रतिएकर 1 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यासह शेतीच्या साहित्यांचा खर्च किमतीच्या आधारावर मंजूर करावा, अशी मागणी घोडाम यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांच्याकडे केली आहे.