हत्तींनी उद्ध्वस्त केले आठ गावांतील शेतकऱ्यांचे पीक

नुकसानभरपाईची काँग्रेसची मागणी

गडचिरोली : रानटी हत्तींनी आपला मोर्चा गडचिरोली तालुक्याकडे वळविला आहे. चिंचोली, मोहटोला, बेलगाव, रानखेडा, मौशीखांब, मरेगाव चक, मरेगाव, चांभार्डा व खैरी रिठ या गावांच्या शिवारात हत्तींनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हत्तींच्या या अचानक झालेल्या प्रवेशामुळे उभी पिके तुडवली गेली असून अनेक शेतांमधील पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

या घटनेमुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच अवकाळी पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या जंगली हत्तींमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील नागरिकांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची भेट घेतली. ब्राह्मणवाडे यांनी वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची मागणी केली. तसेच जंगली हत्तींचा बंदोबस्त करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी केली.

यावेळी काँग्रेसचे गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत , पांडुरंग समर्थ (अध्यक्ष, वन समिती मौशीखांब), बंडू लटारे (अध्यक्ष, वन समिती बेलगाव), शंकर नैताम (माजी पंचायत समिती सदस्य), जगदीश कुनघाडकर, पुंडलिक कोठारे (उपाध्यक्ष, वन समिती बेलगाव), अमृत वासेकर, परसराम कोठारे, शंकरराव भांडेकर, नाजुकराव जुमनाके, मुकुंदा नैताम, बाबुराव चौधरी, बाबुराव हरडे, भक्तदास खेवले, राजेश नानाजी, प्रदीप टेकाम, उमाजी वलादी आदी उपस्थित होते.