गडचिरोली : मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास दोन तरुण हत्तींनी गडचिरोली शहरात मुक्तसंचार करण्याच्या घटनेने एकच खळबळ उडाल्यानंतर वनविभाग सतर्क झाला आहे. हे हत्ती सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात परत जावेत यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्यासोबत रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पुन्हा हे हत्ती नजरेस पडल्यास त्यांचा पाठलाग करणे किंवा जवळून फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये, तसे करणे धोक्याचे आहे, असा इशाराही दिला आहे. (सविस्तर बातमीसाठी खाली स्क्रोल करा)
पहाटे 2 वाजताच्या सुमारास दोन टस्कर (नर) हत्तींनी बोदली, इंदिरानगर, माडेतुकूम कडून शहरात प्रवेश केला. नंतर हे हत्ती पोटेगाव मार्गाने निघाले, पण पलिकडे न जाता त्यांनी शहराच्या दिशेने मोर्चा वळवून रेड्डी गोडाऊन, शाहूनगर, गोकुळनगरातून थेट मूल मार्गावर आपला मोर्चा वळविला. त्यानंतर पुन्हा राष्ट्रीय महामार्गाने ऐटीत धानोरा मार्गाने निघाले यावेळी बस स्थानकाच्या परिसरातही त्यांनी फेरफटका मारल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ते चुरचुराच्या जंगलाकडे निघाले.
दरम्यान शहरात हत्ती आल्याची माहिती 2.30 वाजताच्या सुमारास वनविभागाला मिळताच संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. मध्यरात्रीची वेळ असल्याने कुलरच्या हवेत गाढ झोपलेल्या संबंधित कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी उशिरा का होईना प्रतिसाद दिला. पण तोपर्यंत हत्तींचा अर्धा फेरफटका झाला होता.
जलद प्रतिसाद दलाच्या मदतीने हत्तींना शहरातून जंगलाकडे जाण्यासाठी मार्ग खुला करण्यात आला. त्यानंतर हत्ती सुरक्षितपणे शहरातून बाहेर पडले. या हत्तींवर रेस्पॉन्स टीम निगराणी करत असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. या हत्तींनी एका दुकानाचे किरकोळ नुकसान केल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. हे हत्ती सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात परत जातील यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
सध्या इंदिरानगर, पोटेगाव रोड, धानोरा रोड व इतर भागांतील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. नागरिकांनी हत्ती आढळल्यास त्यांचा पाठलाग न करता अथवा फोटो काढण्याचा प्रयत्न न करता वनविभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, तसेच कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. विशेषतः रात्रीच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे व सतर्क राहावे, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी केले आहे.
ही घटना गंभीर, बंदोबस्त करा- डॅा.अशोक नेते
या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी तत्काळ आपल्या निवासी कार्यालयातून मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून या घटनेवर चर्चा केली. गडचिरोली शहरात रानटी हत्तीनी प्रवेश करण्याची घटना पहिल्यांदाच नजरेस पडली आहे. या ही घटना गंभीर असून वनविभागाने योग्य तो बंदोबस्त करून पुन्हा ते हत्ती शहराच्या दिशेने येणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना डॉ.नेते यांनी केली.
नागरिकांनी देखील सतर्क राहावे, हत्तींना जवळून पाहण्याचा मोह टाळावा, असे आवाहन मा.खा.डॉ.नेते यांनी नागिकांना केले. ही घटना एक प्रकारचा इशारा असून भविष्यात असा प्रकार पुन्हा निदर्शनास आल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडता वनविभागाना 1926 या क्रमांकावर फोन करून कळवावे, असे आवाहन डॅा.नेते यांनी केले.