गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय आणि आर्थिक कामकाजावर कार्यशाळा

विविध वक्त्यांनी केले शंकांचे निरसन

गडचिरोली : येथील गोंडवाना विद्यापीठात विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण प्रमुख पाहुणे म्हणून होते. ही कार्यशाळा पीएम-उषा प्रकल्पाअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. त्याचे समन्वयक डॉ.प्रीतेश जाधव हे देखील उपस्थित होते.

या कार्यशाळेत अनेक विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. त्यात प्रशासकीय कामकाज व बिंदू नामावली, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 या विषयावर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी प्रशिक्षण दिले. वित्तीय कामकाज खरेदी प्रक्रिया व निविदा प्रक्रिया या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रा.डॉ.प्रशांत गावंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

विभागीय चौकशी, पेंशन केस, म.ना.से. नियम या विषयावर विभागीय चौकशी अधिकारी (नागपूर) कन्हैया रतनलाल बजाज यांनी प्रशिक्षण दिले. शैक्षणिक बँक क्रेडिट आयडी या विषयावर डॉ.कृष्णा कारू यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.

कार्यशाळेचे संचालन प्रा.डॉ. प्रशांत ठाकरे यांनी केले. सहाय्यक कुलसचिव डॉ.कामाजी देशमुख यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ.कृष्णा कारू यांनी जबाबदारी सांभाळली. या कार्यशाळेत विद्यापीठाच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत सहभागींना त्यांच्या कामाशी संबंधित महत्त्वाची माहिती देण्यात आली. वक्त्यांनी सहभागींच्या प्रश्नांची उत्तरेही यावेळी दिली.