गडचिरोली : स्थानिक बोलीभाषांचे जतन, संवर्धन आणि नवीन पिढीला त्यांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्र आणि इंग्रजी व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘गोंडी-माडिया बोलीभाषा कौशल्यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विविध क्षेत्रांतील गोंडी-माडिया भाषा तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थींना बहुमोल मार्गदर्शन केले.
गोंडवाना विद्यापीठाचे डॉ.नरेश मडावी यांनी ‘गोंडी भाषेचा उगम, लिपीचा इतिहास आणि सद्यस्थितीतील आव्हाने’ यावर प्रकाश टाकला, तर नायब तहसीलदार वशिराम येरमे यांनी ‘शुद्ध उच्चार पद्धतीचे महत्त्व’ विशद केले. गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ.प्रिया गेडाम यांनी मूलभूत गोंडी संभाषणाचे धडे दिले, तर गिरजा स्मृती आश्रम शाळा, परसवाडी येथील शिक्षक रमेश कोरचा यांनी ‘गोंडी-माडिया काळ रचना व व्याकरणाचे घटक’, जि.प. शाळा व्यंकटरावपेठा येथील शिक्षक बी.के.वड्डे यांनी ‘संवादाची मूलभूत तत्त्वे व प्रसंगानुरूप संवाद’ यावर मार्गदर्शन केले. आदिवासी अध्यासन केंद्राच्या संशोधक विद्यार्थिनी मनीषा हिळको यांनी गोंडी लोकगीते व भाषांतराद्वारे सांस्कृतिक पैलू उलगडले. रघुराम पोटावी यांनी वाक्प्रचार आणि अभिव्यक्तीवर भर दिला.
या प्रसंगी बोलताना कार्यक्रम समन्वयक डॉ.वैभव मसराम यांनी स्पष्ट केले की, आदिवासी अध्यासन केंद्रामार्फत राबविले जाणारे हे उपक्रम भाषा शिकणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमवर ऑनलाइन उपलब्ध करून दिलेला आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना पायाभुत गोंडी-माडिया भाषा अवगत करण्यास याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ‘गोंडी-माडिया’ भाषा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. परीक्षार्थींना या भाषेची प्राथमिक ओळख व्हावी, दैनंदिन संवाद सुलभ व्हावा आणि भविष्यात शासकीय कर्तव्यावर असताना स्थानिक लोकांशी उत्तम प्रकारे संपर्क साधता यावा, या मुख्य हेतूने या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते, असे इंग्रजी विभागाच्या डॉ.शिल्पा आठवले यांनी सांगितले.
या विशेष कार्यक्रमास सहायक आयुक्त प्रमोद वाघमारे यांनी स्वतः एक प्रशिक्षणार्थी म्हणून या वर्गात सहभाग नोंदवला. त्यांनी प्रशिक्षणादरम्यान संपूर्ण वेळ देऊन गोंडी भाषेचे बारकावे आणि व्याकरण समजून घेतले. समारोपीय सत्रात आपले मनोगत व्यक्त करताना वाघमारे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात डॉ.प्रमोद जावरे, स्वाती खोब्रागडे, स्नेहा गेडाम, आदित्य गेडाम आणि किरण विडपी या प्रशिक्षणार्थींनी गोंडी-माडिया भाषेतून आपले अनुभव कथन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.विवेक जोशी, डॉ.नंदकिशोर मने, डॉ.देवदत्त तारे, डॉ.रजनी वाढई, डॉ.अतुल गावस्कर, प्रा.संदीप कागे, प्रा.सत्यनारायण सुदेवाड, डॉ.प्रीती पाटील आणि प्रवीण गिरडकर यांच्यासह विविध विभागांतील प्रशिक्षणार्थींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
































