देसाईगंज : देसाईगंज (वडसा) फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय फोटोशॉप आणि एआय कार्यशाळेचे आयोजन केले होते. येथील हटवार मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेत फोटो एडिटिंग, कलर ग्रेडिंग, मार्केट-ट्रेंडिंग पोस्टर डिझाइन, तसेच एआयचा फोटोग्राफीमध्ये कसा वापर करता येईल, यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ. कृष्णा गजबे उपस्थित होते. त्यांनी डिजिटल युगात फोटोग्राफीचे महत्त्व अधोरेखित केले आणि स्थानिक तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून व्यवसायात नवी उंची गाठण्याचे आवाहन केले. त्यांनी संपूर्ण आयोजक मंडळाचे आणि उपस्थित सहभागींचे कौतुक करत फोटोग्राफर्सना सातत्याने नव्या कल्पना आत्मसात करण्यासाठी प्रेरणा दिली.
या कार्यशाळेत प्रसिद्ध फोटोशॉप एक्स्पर्ट प्रवीण बनसोडे हे विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सकाळी आ.रामदास मसराम, मा.आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनुभवी फोटोग्राफर पूर्णचंद्र सहारे, तेजस्वी फोटो स्टुडिओ आणि अतुल मने (आरमोरी) यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात वडसा फोटोग्राफर असोसिएशनचे संदेश वाघमारे, राजेश कोल्हे, मनीष करंबे, किशोर सरकार, शेखर बनकर, ईश्वर दुफारे, अतुल खरकाटे, पुरुषोत्तम कार, शुभम डिब्बे, नवाब शेख, डिंपल बडोले, तुषार मैंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे स्थानिक फोटोग्राफर्सना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली असून डिजीटल फोटोग्राफी आणि मार्केटिंग या विषयांचे सखोल ज्ञान मिळाले.