उद्या गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात सामूहिक योगासने

जागतिक योग दिनाचे औचित्य

गडचिरोली : शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन, गोंडवाना विद्यापीठ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात भव्य योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्यापासून दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने हा दिन साजरा केला जातो. गडचिरोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात योग दिन साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, महिला, युवक-युवती, क्रीडाप्रेमी, योगपटू, महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषद आणि शासनाच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी गोंडवाना विद्यापीठातील मुख्य कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एनसीसी, नेहरू युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था आणि औद्योगिक प्रतिष्ठाने यांनीही आपल्या स्तरावर योग दिवसाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.