सुट्या घेऊन गावी आलेल्या युवा अभियंत्यावर काळाची झडप

नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू

गडचिरोली : महावितरणमध्ये सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील कारमपल्लीच्या युवा अभियंत्याचा शेतालगत असलेल्या नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दलसु कटिया नरोटे (37 वर्ष) असे त्या अभियंत्याचे नाव आहे. जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधनानिमित्त काही दिवसांच्या सुट्या घेऊन ते पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह आपल्या गावाकडे आले होते. पण काळाने अचानक झडप घातल्याने त्यांच्या सुखी संसारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)

दलसू हे नांदेड तालुक्यातील मुखेड येथे महावितरण विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होते. 7 ऑगस्ट रोजी ते पत्नी आणि दोन मुलांना घेऊन (सासुरवाडी) पुल्लिगुडम (ता.मुलचेरा) येथे गेले होते. शुक्रवार दि.8 रोजी शेतात रोवणीचे काम सुरू असल्याने त्यांनी शेताकडे जाण्याचा बेत केला. दरम्यान इकडे रोवणी सुरू असताना ते लगतच्या नाल्यावर गेले. पण तिथे फिट (मिर्गी) आल्याने ते पाण्यात पडले. बऱ्याच वेळपासून दलसू परत आले नसल्याने घरच्यांनी शेताकडील नाल्याकडे शोध घेतला. त्या ठिकाणी ते नाल्याच्या पाण्यात पडून असल्याचे दिसून आले.

कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने दलसूला दुचाकीवरून गावात आणले. त्यानंतर खाजगी वाहनाने एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले, पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. आज शनिवारी (9 ऑगस्ट) रोजी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

एटापल्ली तालुक्यातील पहिले वीज अभियंता

दलसु कटिया नरोटे हे एटापल्ली तालुक्यातील कारमपल्लीचे रहिवासी असून 2014 मध्ये ते महावितरणमध्ये अभियंता म्हणून रुजू झाले होते. त्यांनी गडचिरोली, कोल्हापूर, परभणी जिल्ह्यात सेवा दिली आहे. महावितरणमध्ये सेवा देणारे ते एटापल्ली तालुक्यातील पहिलेच अभियंता होते. त्यांना दोन चिमुकली मुले आहेत. या घटनेने नरोटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.