गडचिरोली : एका दुचाकीवरून दोन तरुणींना घेऊन जाणाऱ्या युवकाचे वाहन अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्या तरुणीसह युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात एटापल्लीपासून 5 किलोमीटरवर असलेल्या तुमरगुंडा गावाजवळ आलदंडी मार्गावर घडला.
प्राप्त माहितीनुसार, तुमरगुंडा येथील नातेवाईकाकडील लग्न समारंभ आटोपून तिघे जण मोटारसायकल क्रमांक एमएच 33 एजी 3402 या दुचाकीवरून परसलगोंदी येथे परत येत होते. दोन तरुणींना घेऊन येत असताना युवकाचा वाहनावरील ताबा सुटला. एका दुचाकीवर ट्रिपल सिट जाताना कोणीही हेल्मेट लावलेले नव्हते. त्यामुळे नियंत्रण सुटताच दुचाकी रस्त्याच्या कडेला घसरून तिघेही खाली कोसळले.
अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवर बसलेली बनी मैनु दुर्वा (27 वर्षे) हिचा जागीच मृत्यू झाला, तर मीना सैनु दुर्वा (20 वर्षे) ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने हेडरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच दुचाकी चालक रुपेश गावडे (27 वर्षे) हासुद्धा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
































