गडचिरोलीच्या युवांनी साधला क्रीडा मंत्र्यांशी थेट संवाद

'गावं तिथे ग्राउंड' होणार

देसाईगंज : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत आयोजित “विकसित महाराष्ट्र 2047 युवा व क्रीडा संवाद, नागपूर” हा भव्य कार्यक्रम 20 सप्टेंबर 2025 रोजी विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे पार पडला. या कार्यक्रमात गडचिरोलीतील युवकांनी राज्याचे युवा व क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी थेट संवाद साधत त्यांना काही योजना सूचविल्या.

यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा युवा पुरस्कार्थी सूरज चौधरी यांनी आपले मुद्दे मांडताना ‘गाव तिथे ग्राउंड’ ही योजना राज्यात राबवावी, तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये, तसेच जिल्हा, राज्यस्तरावर युवकांसाठी क्रीडा समुपदेशन केंद्र सुरू करावे, मोबाईलपासून मुलांना दूर ठेवून त्यांना मैदानाकडे वळविण्यासाठी ‘मोबाईलकडून मैदानाकडे’ असे विशेष उपक्रम राबवावे, तसेच योगाभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे, शाळा तिथे क्रीडा शिक्षक अशा योजनां सूचविल्या. सदर सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री कोकाटे यांनी ‘गाव तिथे ग्राउंड’ संदर्भात शासन निर्णय लवकरच काढण्याचे आश्वासन दिले. इतरही बाबींना नवीन धोरणात लागू करण्याबद्दल त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, क्रीडा उपसंचालक पल्लवी धातक, गडचिरोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे आदी उपस्थित होते.

नागपूर विभागातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, तसेच जिल्हा युवा पुरस्कार्थी व युवक संघटनांचे प्रतिनिधी या संवाद कार्यक्रमाला उपस्थित होते. या संवादादरम्यान मंत्री कोकाटे यांनी थेट युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.

या कार्यक्रमात जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातून सूरज चौधरी, रविंद्र बंडावार, राहुल वैरागडे, रश्मी वाळके, राष्ट्रीय धनुर्धर जय ठेम्बले, संघटक स्कॅश खेळाचे प्रमुख सरोजित मंडल आदींनी सहभाग नोंदविला.