युवकांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन संस्कृतीचे जतन करावे

युवा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात खा.अशोक नेते यांचे आवाहन

गडचिरोली : कोणत्याही स्पर्धेत जय-पराजय होणे साहजिक आहे. पण पराजयाने खचून न जाताना अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करावे. सांस्कृतिक स्पर्धांसारख्या कार्यक्रमातून व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासोबत कलागुण सादर करण्याची संधी मिळते. यातून आपल्या संस्कृतीचे जतन होते, असे मौलिक मार्गदर्शन खासदार अशोक नेते यांनी केले.

नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित ‘युवा उत्सव २०२३’ या सांस्कृतिक स्पर्धेच्या या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी विविध स्पर्धेत अव्वल येणाऱ्या युवक-युवतींना खा.नेते यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा युवा अधिकारी आमित फुंडे, कृषी महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ.शांती पाटील, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक विवेक कहाळे, सामाजिक संस्थेचे मनोहर हेपट, भास्कर मेश्राम, मनीषा मडावी, युवा मोर्चाचे उल्हास देशमुख, तसेच मोठ्या संख्येने युवा विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

सामूहिक नृत्य, भाषण, चित्रकला, कविता, फोटोग्राफी अशा विविध प्रकारच्या स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्यांना रोख बक्षिसांसह ट्रॅाफी, तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. चित्रकला, कविता, छायाचित्र (फोटोग्राफी) स्पर्धेतील २ विजेते आणि भाषण व सांस्कृतिक कार्यक्रमातील प्रथम विजेत्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळू शकते.