सिरोंचा : दुर्गम भागात राहात असतानाही ईच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर एका युवकाने यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. घरची परिस्थिती जेमतेम असताना आई-वडीलांसोबत त्याने शेतातही काम केले. आई-वडिलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेत त्याला पैसे पुरवले. अखेर त्याने यशाला गवसणी घातली.
ही कहाणी आहे सिरोंचा तालुक्यातल्या रेगुंठा या दुर्गम भागातील दर्शेवाडा गावातल्या युवकाची. अश्विन मुत्तय्या दुर्गे असे त्या तरुणाचे नाव आहे. नुकत्याच झालेल्या पीएसआय (PSI) परीक्षेत त्याने यशस्वी भरारी घेतली आहे. अश्विनचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्शेवाडा येथे झाले. पुढे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद हायकूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय सिरोंचा येथे घेतल्यानंतर त्याने गडचिरोलीच्या शासकीय पॅालिटेक्निक कॅालेजमधून पदविका, तर भंडाऱ्याच्या मनोहभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून नागपूर विद्यापीठातून अव्वल येऊन पदवी प्राप्त केली. पण त्याला इंजिनिअर म्हणून मिरवण्यापेक्षा खाकी वर्दीचे आकर्षण होते.
अश्विनचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी पूर्ण सहकार्य करत त्याला पैसे पुरवले. मोठ्या शहरात जाऊन अभ्यास करणे परिस्थितीमुळे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी गङचिरोलीमध्ये आपल्या मोठ्या बहिणीकडे सुलोचना खोब्रागडे यांच्यासह राहून आपला अभ्यास पूर्ण केला. त्याची जिद्द व प्रयत्नामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने 302 गुण मिळवले आहेत. अश्विनचे वडील पोलीस पाटील असले तरी स्वतःच्या तीन एकर शेतीतून उदरनिर्वाह चालवताना त्यांची कसरत होत असे, पण अनेक वेळा अश्विननेही शेतातील कामे करून त्यांना हातभार लावला. त्यासाठी कधी शेतात मोलमजुरीही करावी लागली.