‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत पोलिसांकडून ब्युटीपार्लर व कुक्कूटपालन प्रशिक्षण

युवक-युवतींना स्वयंरोजगाराची संधी

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांच्या “पोलिस दादालोरा खिडकी”च्या माध्यमातून, जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्रातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. प्रोजेक्ट उडान अंतर्गत व बिओआय आरसेटी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींना ब्युटीपार्लर व कुक्कुटपालन प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ मंगळवार, दि.30 एप्रिल रोजी पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉलमध्ये पार पडला.

गडचिरोली पोलिस दलाच्या पुढाकाराने ब्युटी पार्लर प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्रातील अतिदुर्गम भागातील 35 महिला प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ब्युटीपार्लर प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रत्येकी एक नग ब्युटीपार्लर चेअर वाटप करण्यात आले. तसेच कुक्कुटपालन प्रशिक्षणामध्ये उपविभाग गडचिरोली, सिरोंचा, कुरखेडा अहेरी व धानोरा येथील 30 महिला-पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये 26 पुरुष व 6 महिला प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता.

दिनांक 21 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत 10 दिवसांच्या या प्रशिक्षणात कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन ब्युटीपार्लर व कुक्कुटपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना व्यवसाय सुरु करण्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. सदर निरोप समारंभाला आरसेटी गडचिरोलीचे कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम हेसुद्धा उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी सहकार्य केले.

(महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा वाचा खाली)