गडचिरोलीचा विनय कोवे भारतीय बॉल बॅडमिंटन संघात

महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार

गडचिरोली : जिल्ह्याचा स्टार बॉल बॅडमिंटनपटू विनय कोवे याची साऊथ एशियन बॉल बॅडमिंटन स्पर्धेकरिता भारतीय बॉल बॅडमिंटन संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय बॉल बॅडमिंटन संघात निवड झालेला तो गडचिरोली जिल्ह्याचा पहिला खेळाडू ठरला आहे.

दिल्ली येथे 7 ते 9 नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणीत तो महाराष्ट्राकडून सहभागी झाला होता. त्या चाचणीनंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. विनयने आपल्या बॉल बॅडमिंटन खेळाची सुरुवात इयत्ता सहावीपासून गोंडवाना सैनिकी विद्यालयात असल्यापासून प्रशिक्षक व महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.ऋषिकांत पापडकर यांच्याकडे केली होती. त्याने राष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत महाराष्ट्र संघात 3 वेळा प्रतिनिधित्व केले आहे.

सध्या तो शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील तो रहिवासी आहे. त्याने आपल्या निवडीचे श्रेय बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी सदस्य प्रा.रूपाली पापडकर, महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे सचिव अतुल इंगळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, आशिष निजाम, सुभाष धंदरे, उमेश बुरांडे व संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना दिले आहे.