आजपासून दोन दिवस काटलीत झाडीबोली साहित्य संमेलन

डॅा.धनराज खानोरकर संमेलनाध्यक्ष

गडचिरोली : झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय शाखा साकोली आणि झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीद्वारा 33 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन, गडचिरोली तालुक्यातील काटली येथे केले आहे. आजपासून (दि.27) दोन दिवस काटलीच्या जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या पटांगणात होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मपुरीचे प्रसिध्द कवी, लेखक व झाडीबोलीचे भाष्यकार डॉ.धनराज खानोरकर राहणार आहेत.

सकाळी 8.30 वाजता पुस्तकपोहा (ग्रंथदिंडी) निघणार असून दुपारी 12 वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडेल. उद्घाटक म्हणून गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, तर सहउद्घाटक म्हणून लॅायड्स मेटल्सचे संचालक हिम्मतसिंह बेदला उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरड्डीवार, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, ज्येष्ठ लेखक लखनसिंह कटरे, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, अनिकेत पाटील उपस्थित असतील.

उद्घाटन सत्रानंतर आमचं तीर्थक्षेत्र, आमची अभायारण्यं, आमची माणसं असे तीन परिसंवाद घेतले जातील. रात्रीला एकपात्री, झाडीपट्टीची दंडार, भारुड इ.लोककलेचे कार्यक्रम पार पडतील. दुसऱ्या दिवशी दि.28 डिसेंबरला झाडीबोलीच्या कवयित्री अंजनाबाई खुणेच्या यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडेल. यानंतर आमच्या नद्या यावर परिसंवाद रंगणार आहे. दुपारी 12 वाजता बोलीमहर्षी डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांची मुलाखत डॉ.संजय निंबेकर, विद्या भदाडे घेतील. दु.1 वाजता संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम पार पडेल.

यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ.धनराज खानोरकर, प्रमुख पाहुणे म्हणून आरमोरीचे आमदार रामदास मसराम, डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे, डॉ.हेमराज निखाडे, हेमलता परसा, विलास देशमुखे, प्राचार्य मंगर, रविंद्र मुलकलवार, प्रतिभा आकरे, अँड.संजय ठाकरे, डॉ.प्रवीण किलनाके इ.उपस्थित राहतील.