गोंडवाना विद्यापीठात उद्या रंगणार झाडीबोली नाट्यसंमेलन

डॅा.हरिश्चंद्र बोरकर संमेलनाध्यक्ष

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग व झाडीबोली साहित्य दालनच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या नवीन सभागृहात शुक्रवारी (दि.19) झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक व बोली अभ्यासक डॉ.हरिश्चंद्र बोरकर राहणार आहेत.

या संमेलनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता अमरावती रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे तर विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॅा.श्रीराम कावळे, प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध नाट्य कालावंत पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, माजी झाडीबोली नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ.श्याम मोहरकर, नाट्यकलावंत व नाट्यलेखक डॉ.सदानंद बोरकर, तसेच कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्याम खंडारे आदी उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात होणार विविध स्पर्धा

दुपारी 2 ते 3 या वेळेत संमेलनाध्यक्ष डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांची प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर मुलाखत घेतील, दुपारी 3 ते 4 या वेळेत एकपात्री अभिनय स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी संघ सहभागी होतील. झाडीबोली लोककला स्पर्धा व सायंकाळी समारोप तथा बक्षीस वितरण होणार आहे.

या नाट्यसंमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन सिनेट सदस्य तथा प्रस्तावक झाडीबोली साहित्य दालन, गोंडवाना विद्यापीठ किरण संजय गजपुरे, व्यवस्थापन परिषद सदस्य तथा सहप्रस्तावक गुरुदास कामडी, पदव्युत्तर मराठी विभागाच्या समन्व्यक प्रा.डॉ.सविता गोविंदवार, नाट्य संमेलनाचे समन्वयक निळकंठ नरवाडे, हेमराज निखाडे, अमोल चव्हाण यांनी केले आहे.