झाडीपट्टी रंगभूमीची कला येणाऱ्या प्रत्येक पिढीमध्ये रूजली पाहिजे

नाट्यसंमेलनात मान्यवरांचा सूर

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अतिथींचे स्वागत व सत्कार करताना कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग व झाडीबोली साहित्य दालन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे झाडीबोली नाट्यसंमेलन विद्यापीठ परिसरात पार पडले. झाडीपट्टीतील नाटकांमधून मोठे कलावंत उदयास यावेत आणि ही कला येणाऱ्या प्रत्येक पिढीत रुजावी, असा सूर या संमेलनातून मान्यवरांनी व्यक्त केला.

संमेलनाचे उद्घाटन रिद्धपूर अमरावतीच्या मराठी भाषा विभागाचे कुलगुरू डॅा.अविनाश आवलगावकर यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्षपद सुप्रसिद्ध बोली अभ्यासक तथा साहित्यिक डॅा.हरिश्चंद्र बोरकर यांनी भूषवले. उद्घाटनप्रसंगी स्वागताध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे, विशेष अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध नाट्य कलावंत पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, माजी झाडीबोली नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ.श्याम मोहरकर, नाट्यकलावंत व नाट्यलेखक डॉ.सदानंद बोरकर, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्याम खंडारे, व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदास कामडी, किरण संजय गजपुरे, प्रा.डॉ.सविता गोविंदवार आणि प्रा.रत्नमाला भोयर आदींची उपस्थिती होती.

नवीन शैक्षणिक धोरणात केंद्र सरकारने भाषेला अतिशय महत्त्व दिले आहे. कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण असू दे, सामान्य माणसाला त्याच्या मातृभाषेत घेता आलं पाहिजे. भाषा आणि साहित्याचा अभ्यास करत असताना जोपर्यंत ते आपण आपल्या मातृभाषेत घेत नाही, तोपर्यंत त्यात गोडी निर्माण होत नाही. नाटकांमध्ये समाजमन दडलेलं असतं. मी जेव्हा झाडीबोली साहित्य संस्कृतीचा अभ्यास केला, तेव्हा असं लक्षात आलं की, नाट्य संस्कृतीमध्ये सर्व सामान्यांचं जीवन उत्कृष्टपणे चितरल्या जातं, असे प्रतिपादन उद्घाटक डॉ.अविनाश आवलगावकर यांनी केले.

संमेलनाध्यक्ष डॉ.हरीश्चंद्र बोरकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, साहित्यातील कथा, कविता, कादंबरी यातील सर्वात कठीण प्रकार कुठला असेल तर ते नाटक आहे. विद्यापीठाचे स्वतःचे वाचनालय असावे, ज्यात झाडीपट्टीशी संबंधित गोष्टी असतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्वागताध्यक्ष डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, एखादा उपक्रम सुरू करणे हे सोपे असते, पण तो उपक्रम सातत्याने सुरू ठेवणे आणि त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करून तो तडीस नेणे हे खूप महत्त्वाचे असते. मी एक-सव्वा वर्षाने या विद्यापीठात नसलो तरी येणाऱ्या 100 वर्षात या विद्यापीठामध्ये झाडीबोली रंगभूमीशी संबंधित नाट्यसंमेलन व्हायला हवे. हा उपक्रम विद्यापीठ परिसरातील लोकांच्या आशा-आकांक्षा आणि कलाकृतीशी जोडलेला आहे. हे नाट्य संमेलन म्हणजे केवळ विद्यापीठाशी जुळलेले नाही तर येथील कलाकारांशी जुळलेले आहे. या सगळ्या कलावंतांची उठबस इथे राहिली पाहिजे. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना विद्यापीठात आपले प्रतिबिंब दिसायला हवे. सामान्य लोकांना हे विद्यापीठ आपले वाटावे म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले.

प्रास्ताविक नाट्यसंमेलनाचे समन्वयक डॉ.नीलकंठ नरवाडे, संचालन डॉ.हेमराज निखाडे यांनी, तर आभार सिनेट सदस्य किरण गजपुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या चमुने परिश्रम घेतले.