गडचिरोली : झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या देसाईगंजमध्ये आजपासून (दि.4) दोन दिवसीय झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, आणि कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दुपारी 1.30 वाजता या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विरोधीपक्ष नेते आ.विजय वडेट्टीवार हे राहतील. याशिवाय मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
देसाईगंजमधील आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणावर होत असलेले हे झाडीपट्टीचे पाचवे नाट्य संमेलन आहे. या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ रंगकर्मी के.आत्माराम हे भूषविणार आहेत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार रामदास मसराम असून माजी मंत्री व आ.सुधीर मुनगंटीवार, खा.डॅा.नामदेव किरसान, माजी खासदार डॅा.अशोक नेते, माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह झाडीपट्टीतील सर्व लोकप्रतिनिधींना या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय पद्मश्री डॅा.परशुराम खुणे आणि जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील.
उद्घाटनानंतर आदिवासी नृ्त्य, परिसंवाद, नाट्यगीते, लावण्या आणि झाडीपट्टी नाटकांची मेजवाणी रसिकांना मिळणार असल्याचे झाडीपट्टी नाट्यविकास मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिरूद्ध वनकर यांनी सांगितले.
सहपालकमंत्री जयस्वाल यांचा दौरा
सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील. मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा व सरळसेवेने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता देसाईगंज (वडसा) येथे झाडीपट्टी नाटयसंमेलन कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर दुपारी 3 ते 4.30 पर्यंत शासकीय विश्रामगृह वडसा येथे त्यांचा वेळ राखीव राहील. त्यानंतर नागपूरकडे प्रयाण करतील.