झेंडेपार लोहखाणींच्या जनसुनावणीसाठी गडचिरोलीत तगडा पोलिस बंदोबस्त

नियोजन भवनासह बाहेरही स्क्रिनची व्यवस्था

गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर भागातील झेंडेपार लोहखाणींची लिज पाच कंपन्यांना मिळाली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने या खाणीची पर्यावरणविषयक जनसुनावणी मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात ठेवली आहे. जिल्ह्यातील खाणींना नक्षलवाद्यांचा आधीपासून विरोध आहे. सोबत काही राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने जनसुनावणीच्या वेळी कोणतीही गडबड होऊ नये, शांततेत ही सुनावणी पार पडावी यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या जनसुनावणीसाठी किमान एक हजार लोक येण्याची शक्यता असून त्यादृष्टिने तयारी करण्यात आली आहे. लोहखाणीच्या १० किलोमीटर परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांनाच या जनसुनावणीसाठी प्रवेश मिळणार असल्याचे समजते. कोरची तालुक्यातील लोहखाणीच्या क्षेत्रातील गावकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या मैदानात करण्यात आली आहे.

नियोजन भवनासोबत भवनाच्या बाहेरसुद्धा दोन मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी हॅालमधील जनसुनावणीचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा मोठ्या स्क्रिनवर राहील. या सर्वच ठिकाणी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी तपासणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

विविध पक्ष आणि संघटनांचे आक्षेप

वनहक्क,पेसा आणि जैवविविधता अशा विविध कायद्यांना डावलून खाणी खोदू नका, या मागणीसाठी जिल्ह्यातील शेकाप, भाकप, माकप, अभारिप, बीआरएसपी यासह विविध पक्ष आणि संघटनांनी इ-मेलद्वारे आक्षेप नोंदविले आहेत. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडे हे आक्षेप नोंदविण्यात आल्याचे शेकापचे नेते रामदास जराते यांनी कळविले. याशिवाय कोरची तालुक्यातील ग्रामसभांचा विरोध असताना शासनाकडून पर्यावरणविषयक जनसुनावनी घेणे ही मुस्कटदाबी असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.