गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क आणि गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकांमधून भरली जाणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेअंतर्गत सन 2023 मध्ये पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणांची तपासणी करून पुर्ण माहिती असलेल्या एकूण 251 उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता सुची तयार करून जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या फलकावर प्रकाशित करण्यात आली होती. त्यातील पहिल्या दिडशे उमेदवारांचे समुपदेशन केले जाणार आहे.
प्रतीक्षाधीन सूचीतील अनुक्रमांक 1 ते 150 पर्यतच्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या दस्तावेजांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता वर्ग-3 व वर्ग-4 च्या पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यासंबंधाने समुपदेशन घेण्यात येणार आहे. प्रकरण पूर्ण असलेल्या प्रतिक्षाधीन सुचीतील पहिल्या दिडशे उमेदवारांनी मुळ दस्ताऐवजांसह वीर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे समुपदेशानाकरीता उपस्थित राहावे. अनुकंपाधारकांची नेमणूक शैक्षणिक अर्हता तसेच सामाजिक प्रवर्गानुसार समुपदेशन प्रक्रियेव्दारे व पारदर्शकता ठेवून राबविण्यात येणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला / प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.