चामोर्शी : भारतीय जनता पक्ष मंडळ चामोर्शीतर्फे “सेवा पंधरवडा–2025” आणि तालुका कार्यकारिणीची विस्तारित बैठक माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यालय, चामोर्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. ‘आत्मनिर्भर भारत, सेवा-सुशासन आणि गरीब कल्याण ही सेवा पंधरवाडा अभियानाची त्रिसूत्री आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आज भारत नवा इतिहास रचत आहे. कार्यकर्त्यांनी गावोगावी, घराघरांत स्वदेशीचा संदेश पोहोचवावा आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत महासत्ता घडविण्याचा संकल्प दृढ करावा,’ असे आवाहन यावेळी डॅा.नेते यांनी केले.
सेवा पंधरवड्यातील कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट करत त्यांनी दि.17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, बुथ बैठक व ‘मन की बात’ प्रक्षेपण कार्यक्रमासोबतच 25 सप्टेंबर रोजी पं.दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त सेवा कार्यक्रम प्रत्येक मंडळ व गावपातळीवर उत्साहात घेण्याचे आवाहन केले.
या बैठकीला जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, आदिवासी आघाडीचे जिल्हा महामंत्री रेवनाथ कुसराम, युवा नेते नरेश अल्लसावार, निरज रामानुजवार, संजय खेडेकर, शेषराव कोहळे, वासुदेव चिचघरे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष कविता किरमे, तसेच भुवनेश्वर चुधरी, अतुल केशवा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बैठकीच्या प्रारंभी माजी आमदार डॉ.देवराव होळी यांचे सोशल मीडिया प्रमुख स्व.तुषार सातपुते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच संघटनात्मक धोरणावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत युवा नेते नितेश जुवारे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.