
गडचिरोली : यावेळी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात तीनही नगर परिषदेत आपले उमेदवार उभे केले होते. त्यात गडचिरोली आणि देसाईगंजमध्ये शिवसेनेसोबत (शिंदे गट) युती करून तर आरमोरीत स्वतंत्रपणे निवडणूक लढली. त्यात राष्ट्रवादीचे गडचिरोलीत 5, तर देसाईगंजमध्ये 2 नगरसेवक निवडून आले आहेत.
विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या गडचिरोलीतील उमेदवार अश्विनी रविंद्र नैताम आणि आरमोरीतील उमेदवार जयकुमार महादेव मेश्राम यांनी यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. अगदी कमी कालावधीत तयारी करून मिळवलेले हे यश उल्लेखनिय ठरले आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशामुळे वातावरण निर्मिती होण्यास वाव मिळाला.
प्रभाग क्रमांक 11 ब मधील लढतीकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्यातील लढत चर्चेचा विषय ठरली होती. 2 डिसेंबरचे मतदान आयोगाच्या निर्देशानुसार ऐनवेळी पुढे ढकलून 20 डिसेंबरला करण्यात आले. या प्रभागात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी प्रचारसभा घेतल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर त्यात लिलाधर भरडकर सरस ठरले.
या विजयानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेत गुलालाने माखून टाकले. त्यानंतर प्रभागातून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवकांमधून सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी होण्याचा बहुमानही त्यांनी पटकावला.
































