नगराध्यक्ष-नगरसेवक पदाचे 41 नामांकन झाले छाननीत रद्द

हिंगे-चिचघरे बाद, पिपरे कायम

गडचिरोली : जिल्ह्यात तीन नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणाऱ्या 35 नामांकनांपैकी 8 जणांचे तर सदस्यपदासाठी प्राप्त 168 नामांकनांपैकी 33 अर्ज छाननीत विविध कारणांमुळे रद्द झाले आहेत. प्रामुख्याने अर्ज भरताना राहिलेल्या त्रुटी त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. पुरेशा संख्येने अनुमोदक नसणे, अर्ज भरताना पक्षाचे नाव टाकले असताना प्रत्यक्षात शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॅार्म जोडता न येणे, एकाच उमेदवाराचे डबल अर्ज असणे, तसेच काही जणांना तीन अपत्य असल्याचे आढळणे, अशा विविध कारणांमुळे त्यांचे नामांकन अर्ज छाननीत रद्द करण्यात आले आहेत.

भाजपने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा शेवटच्या क्षणी केली. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात होते. गडचिरोलीत भाजपकडून प्रबळ दावेदार असणाऱ्या गीता हिंगे, लिना चिचघरे यांनी तिकीट आपल्याला मिळेल या आशेने भाजप पक्षाच्या नावावर नामांकन भरले होते. परंतू प्रणोती निंबोरकर यांना तिकीट मिळाल्याने एबी फॅार्म केवळ त्यांच्याकडेच होता. एबी फॅार्म नसताना पक्षाचे नाव नामांकन अर्जात नमुद असल्यामुळे मंगळवारी अर्जांची छाननी करताना हिंगे आणि चिचघरे यांचे नामांकन रद्द झाले. माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी अपक्ष म्हणून नामांकन भरले होते, ते वैध ठरले आहे. त्यामुळे पिपरे अधिकृत उमेदवाराविरूद्ध बंड करून आपली उमेदवारी कायम ठेवतात का, याकडेही सर्वांच्या नजरा राहणार आहे.

देसाईगंजमध्ये माजी नगराध्यक्ष शालू दंडवडे यांनी अपक्ष नामांकन भरल्याने ते वैध ठरले आहे. त्यामुळे तिथे तूर्त बंडखोरीचे संकेत दिसत असले तरी शालूताई आपली उमेदवारी मागे घेतील, असा विश्वास माजी आमदार कृष्णा गजबे आणि ज्येष्ठ नेते किशन नागदेवे यांनी व्यक्त केला.

आरमोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिघांनी नामांकन भरले होते. पण एबी फॅार्म नसल्याने दोघांचे अर्ज बाद होऊन जयकुमार मेश्राम या अधिकृत उमेदवाराचा अर्ज कायम राहिला. नामांकन वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी 25 नोव्हेंबपर्यंत मुदत आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातून कोण-कोण बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. याशिवाय प्रमुख पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना यश येते का, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.