‘झोपा काढा’ आंदोलनातून आम आदमी पक्षाने वेधले लक्ष

शैक्षणिक दुरावस्था दूर करा

गडचिरोली : जिल्ह्यातील जि.प.च्या शाळा इमारतींची दुरवस्था, शिक्षकांची कमतरता अशा शैक्षणिक असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने गुरूवारी जिल्हा परिषदेच्या आवारात प्रतिकात्मक ‘झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले. कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी या इमारतींची दुरूस्ती करावी, अशी मागणी यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष नासिर हाशमी यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांना दिलेल्या निवेदनातून केली.

ही शैक्षणिक दुरवस्था तु्म्हाला दिसत नाही, कारण तुम्ही झोपा काढत आहात. आता आम्ही तुमच्या दारात झोपा काढून तुम्हाला जागे करतो, असे हाशमी यांनी सांगत या आंदोलनातून प्रशासकीय यंत्रणेचे या समस्येकडे लक्ष वेधले. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा इमारती शिक्षकांच्या भरतीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

धोकादायक झालेल्या शाळा इमारती, शिक्षकांची रिक्त असलेली पदे, कंत्राटी शिक्षकांचे थकीत मानधन, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि कमी पटसंख्येच्या नावाखाली 72 शाळा बंद करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे. या गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि तात्काळ उपाययोजनांची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या इमारतीबाहेर घोषणाबाजी करत आंदोलकांनी आवारात प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यद्वाराजवळ प्रतीकात्मक झोपा काढून शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष नासिर हाशमी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष राजू मडावी, जिल्हा संघटक ताहीर शेख, जिल्हा सचिव अमृत मेहेर, संघठन मंत्री चेतन गहाणे, अहेरी तालुका प्रमुख नागेश तोरेम, सिरोंचा तालुका प्रमुख सिराज पठाण, कुरखेडा युवा अध्यक्ष अतुल सिंदराम, देसाईगंज शहर अध्यक्ष आशिष घुटके, सचिव फारूक पटेल, तसेच रामदास गोंडाने, वामन पगाडे, इरफान पठाण, शत्रुघ्न नन्नावरे, साहिल बोदेले, संतोष कोडापे, राहील खतीब, प्रेम बहेटवार यांच्यासह जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पालकही सहभागी झाले होते.