ओबीसी आरक्षणात जरांगेंचा हस्तक्षेप सहन करणार नाही

भाजपने केले निषेध आंदोलन

गडचिरोली : मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या भूमिकेविरोधात गुरूवारी (दि.28) भाजपच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. शहरातील इंदिरा गांधी चौकात भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने निदर्शने करत जरांगे यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला.

या आंदोलनात माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, ओबीसी नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, कि.मो.प्र.सचिव रमेश भुरसे, समन्वयक प्रमोद पिपरे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, डॉ.चंदा कोडवते, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, अनिल पोहनकर, का.मो.प्र. सचिव गोवर्धन चव्हाण, डॉ.नितिन कोडवते, विलास भांडेकर, मधुकर भांडेकर, सुधाकर पेटकर, दत्तू सुत्रपवार, अनिल कुनघाडकर, अनिल तिडके, पुष्पा करकाडे, रविंद्र गोटेफोडे, नंदु पेठेवार, पंकज खरवडे, बंडू झाडे, रमेश नैताम, सरपंच आकाश निकोडे, मुक्तेश्वर काटवे, आकाश सातपुते, वासुदेव बट्टे, पिंटू आकरे, विनोद देवोजवार, अनिल करपे, दीपक सातपुते, बंटी खडसे, जनार्दन साखरे, विकास पायदलवार, किर्ती मासुरकर, गणेश दहेलकर, रत्नदिप म्हशाखेत्री, शेषराव कोहळे, भाविक आभारे, विशाल मांडवे, दत्तू माकोडे, चंद्रकांत बारसागडे आदी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या निषेध आंदोलनात बोलताना माजी खासदार डॉ.अशोक नेते म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या मनोज जरांगेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज गडचिरोली जिल्ह्यात निषेधाचा आवाज उठला आहे. यानंतर प्रत्येक तालुक्यात अशाच पद्धतीने आक्रमक निषेध आंदोलन करून जरांगे यांना त्यांची जागा दाखवली जाईल. ओबीसी आरक्षण हा घटनात्मक हक्क व अधिकार असून कुणालाही या हक्कावर गदा आणू दिली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, ही आंदोलकांची ठाम भूमिका व मागणी आहे. ओबीसी समाज संपूर्ण ताकदीने आपल्या पाठिशी उभा आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रतिमेवर चपलांचा वर्षाव
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “जरांगे मुर्दाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जरांगे यांच्या प्रतिमेवर चपलांचा वर्षाव करून निषेध व्यक्त करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांच्या रक्षणासाठी ठाम आणि आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या निषेध आंदोलनानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन व चर्चा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केले.