अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या अहेरी येथील नगर पंचायतच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांसह एकूण 9 सदस्यांना जिल्हाधिकारी संजय दैने यांनी अपात्र घोषित केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सार्वजनिक जागेवर केलेल्या बांधकामाला नियमानुकूल करण्यासाठी नगर पंचायतमध्ये ठराव घेऊन सदर 9 सदस्यांनी बहुमताच्या जोरावर तो ठराव संमत केला होता. अवैध बांधकामाला मदत करण्याचा हा प्रयत्न नियमांचा भंग करणारी कृती असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सदस्यांना पदावर राहण्यास अपात्र ठरविले. यात नगराध्यक्ष रोजा करपेत आणि उपाध्यक्ष शैलेष पटवर्धन यांच्यासह एकूण 9 जणांचा समावेश आहे.
17 सदस्यीय अहेरी नगर पंचायतमध्ये तीन वर्षांपूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या गटाने सत्ता स्थापन केली होती. कंकडालवार यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाच्या रोजा करपेत नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचे बंडखोर सदस्य शैलेष पटवर्धन हे उपनगराध्यक्ष झाले. यादरम्यान नियमबाह्य निविदा प्रक्रिया, कंत्राटदारांवर अॅट्रॅासिटीचे प्रकरण यामुळे नगर पंचायतचा कारभार चर्चेचा विषय झाला होता. दरम्यान अडीच वर्षांपुर्वी अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील शासकीय जागेवरच्या अतिक्रमणाला पाठबळ देणारा ठराव सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत पारित केला होता.
शासकीय जागेवर अतिक्रमणाला संरक्षण देणारे कृत्य हे नगरसेवकपदाचा दुरुपयोग असल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी आणि गडचिरोली न्यायालयात नगरपालिका, नगरपंचायत अधिनियम 1965 चे कलम 44 (3) नुसार फिर्याद नोंदविली होती. जिल्हाधिकारी गडचिरोली यांना बेकायदेशीर अतिक्रणाचे सर्व पुरावे देऊन भाजपच्या नगरसेवकांनी मागील अडीच वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला.
यादरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी उपनगराध्यक्ष पटवर्धन यांच्यासह आविसंचे 3 आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे 2 बंडखोर नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) दाखल झाले. गेल्या दोन वर्षांपासून भाजपच्या तक्रारीवर काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान जिल्हाधिकारी संजय दैने यांचा बदलीचा आदेश निघाला त्याच दिवशी (दि.24) या प्रकरणाचा निकाल देत नगराध्यक्ष रोजा करपेत आणि उपाध्यक्ष शैलेष पटवर्धन यांच्यासह विलास सिडाम, नौरास रियाज शेख, मिना ओंडरे, सुरेखा गैडशेलवार, ज्योती सडमेक, विलास गलबले, महेश बाकेवार या सर्व 9 नगरसेवकांना अपात्र घोषित करणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला.