महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची 15 पासून युवा आक्रोश पदयात्रा

विधान भवनाला घेराव घालणार

गडचिरोली : बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या समस्या, राजकीय गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या अडचणी यासारख्या गंभीर समस्यांवर जनजागृती करण्यासाठी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने 15 ते 19 मार्चदरम्यान पुणे ते मुंबई या मार्गावर पदयात्रा काढली जाणार आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी होणार आहेत. याशिवाय दि.19 ला विधान भवनाला घेराव घालणार असून त्या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील 500 वर पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अॅड.विश्वजीत मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतीश विधाते, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, नेताजी गावतुरे, विवेक घोंगडे, जनार्धन गावतुरे, जितू मुनघाटे, प्रेमानंद गोंगले, संजय चन्ने, बालू भोयर, अमर भरणे, विकास चिचघरे, प्रांजल धाबेकर, चारुदत्त पोहणे, स्वप्नील बेहरे, कमलेश बारस्कर, गौरव येणप्रेडीवर, विपुल येलट्टीवार, जावेद खान, अनिकेत राऊत, प्रफुल बारासागडे, तेजस कोंडेकर, कुणाल आभारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खनिज निधीप्रकरणी इतरांवर कारवाई केव्हा?

जिल्ह्यातील खनिज निधीचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवत जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे यांची बदली करण्यात आली. मात्र त्यासाठी केवळ ते एकटेच जबाबदार नसून इतर दोषींवर कारवाई का नाही, असा सवाल यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी अनेक स्थानिक मुद्द्यांना हात घातला. आमच्या आंदोलनाच्या वेळीच कलम 37 चा वापर केला जातो, पण इतर कार्यक्रमांच्या वेळी लोक एकत्र येतात ते चालते, ही मुस्कटदाबी करू नये अशी भावना व्यक्त केली. कोनसरी प्रकल्पात 70 टक्के स्थानिक लोकांनाच रोजगार द्यावा, रखडलेली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि वसतिगृहाची पूर्तता करा, अशीही मागणी त्यांनी केली.