गडचिरोली : गडचिरोली आणि अहेरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू ईच्छिणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाबरोबर आता खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाने (कांशीराम) स्थानिकस्तरावर आघाडी जाहीर केली आहे.
आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या आघाडीची घोषणा केली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते, शामसुंदर उराडे, अक्षय कोसनकर, आझाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, कार्याध्यक्ष विनोद मडावी, महासचिव पुरुषोत्तम रामटेके, राहुल उराडे, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ॠषी सहारे, समविचारी मित्र पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव देवराव चवळे, विनोद झोडगे, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार आदी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्षातर्फे गडचिरोली विधानसभेकरीता जयश्री जराते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आझाद समाज पक्षही आरमोरी विधानसभेच्या रिंगणात आपला उमेदवार उतरवणार आहे. त्यामुळे इतर समविचारी पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष आणि आझाद समाज पक्ष आता स्थानिक आघाडी करुन जिल्ह्यातील तीनही जागा लढणार असल्याचे जराते यांनी कळविले.
येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकाही हे पक्ष एकत्र लढून प्रस्थापित काँग्रेस-भाजपला आव्हान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.