सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका- आ.धर्मरावबाबा आत्राम

आमसभेत रस्ते, वीज, नेटवर्क गाजले

मुलचेरा : तालुक्यातील मुख्य रस्ते, वीज व नेटवर्कची दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित विभागाला वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या निवेदनाची दखल घेतल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. तालुकावासियांच्या भावना समजून घ्या आणि समस्या सोडवा. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरू नका, असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुलचेरा पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत ते बोलत होते. तहसीलदार चेतन पाटील, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहा.गटविकास अधिकारी एल.बी.जुवारे, ठाणेदार महेश विधाते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास, पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा येमुलवार, सरपंच भावना मिस्त्री, नगर पंचायतचे उपाध्यक्ष मधुकर वेलादी, कोठारीचे उपसरपंच मनोज बंडावार, ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत मडावी, ग्रा.पं.सदस्य निखिल इज्जतदार, रंजित स्वर्णकार, बबलू शील, अपूर्व मुजुमदार आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

आमसभेत मागील वर्षीचा अहवाल वाचन करून ते काम पूर्ण झाल्याची खात्री करून त्यांनी एकेका विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील चारही बाजूंच्या रस्त्यांची फार दयनीय अवस्था झाली आहे, नेहमीच विजेचा लपंडाव सुरू असतो. येथील अधिकारी आणि कर्मचारी गायब असतात. तालुका मुख्यालय असून नेटवर्क नसल्याचे उपस्थित नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना आ.आत्राम यांनी जाब विचारत त्यांची खरडपट्टी काढली. यासोबतच जलजीवन मिशनचे काम, घरकुल, तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले.

उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत समस्या जाणून घेऊन घेताना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उभे करून त्याबद्दल जाब विचारला. एवढेच नव्हे तर प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे रस्ते, वीज, नेटवर्क तसेच बससेवा यावर मुलचेरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा गाजली. कार्यक्रमाचे संचालन प्रभारी केंद्रप्रमुख महेश मुक्कावार यांनी केले. पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी आ.धर्मरावबाबा आत्राम यांचे स्वागत केले.

घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेऊ नका

गोरगरिबांना डोक्यावर छत मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकारतर्फे विविध घरकुल योजना राबविली जात आहे. प्रत्येकाला घर मिळावे या उदात्त हेतूने जास्तीत जास्त घरकुल देण्याचे काम शासनामार्फत केले जात आहे. मात्र घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गरीब लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून कुठल्याही कर्मचाऱ्याने पैसे घेतल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला.