गडचिरोली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आज दि.3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याची मुदत दिली असल्यामुळे हे तीन दिवस पक्षाचे कार्यालय ईच्छुकांच्या गर्दीने गजबजणार आहे.
ईच्छुकांसाठी वेगवेगळे शुल्कही काँग्रेस पक्षाने निश्चित केले आहेत. त्यात नगराध्यक्षासाठी ईच्छुक खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 5000 रु., एससी, एसटी व महिलांकरीता 2500 रु., नगर परिषद सदस्य खुल्या प्रवर्गासाठी 2000 रु., एससी-एसटी व महिलांकरीता 1000 रुपये, जिल्हा परिषद सदस्य खुल्या प्रवर्गासाठी 2500 रु., एससी-एसटी व महिलांकरीता 1250 रुपये, पंचायत समिती सदस्य खुला प्रवर्ग 1500 रुपये, एससी-एसटी व महिलांकरीता 750 रु. याप्रमाणे शुल्क ठेवले आहेत. या शुल्कासह 5 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली किंवा आ.रामदास मसराम यांचे जनसंपर्क कार्यालय, वडसा किंवा सर्व तालुकाध्यक्ष यांच्यामार्फत जमा करता येणार आहे.
प्राप्त अर्जानुसार गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज नगर परिषदेकरिता ईच्छुकांच्या मुलाखती 6 नोव्हेंबर रोजी, जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे घेण्यात येणार आहेत, असे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी कळविले.
            































