गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अपघाती निधनानंतर त्यांचा अस्थिकलश गुरुवार, दि.5 फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. वडसा, आरमोरी, गडचिरोली आणि चामोर्शी येथे हा कलश दर्शनासाठी ठेवला जाणार आहे.
प्रथम देसाईगंज (वडसा) येथे सकाळी 10.30 वाजता अस्थिकलशाचे आगमन होईल़. त्यानंतर दुपारी 12 वाजता आरमोरी, दुपारी 1.30 वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली, दुपारी 3.30 वाजता चामोर्शी आणि सायंकाळी 4 वाजता विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडादेव येथील उत्तर वाहिनी वैनगंगा नदीच्या पात्रात अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात येणार आहे़.
जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी संघटना पदाधिकारी व नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेण्याकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन राकाँचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष तथा नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी केले आहे़.
































